राजकुमार राव या अभिनेत्याने बॉलिवूडमध्ये त्याचा स्वत:चा एक ठसा उमटवला आहे, वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याचा ‘श्रीकांत’ हा चित्रपट नुकताच रिलीज झाला. तर ‘मिस्टर अँड मिसेस माही’ हा जान्हवी कपूरसोबतचा आणखी एक चित्रपट या महिन्याच्या अखेरीस प्रदर्शित होण्यास तयार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर समोर आला असून त्याचे बरेच कौतुक होत आहे. अनेकांना हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता आहे. एका पॉडकास्टमध्ये, राजकुमारने जुन्या आठवणींना उजाळा दिला. ‘बूगी वूगी’ या टीव्ही डान्स रिॲलिटी शोसाठी तो गुरुग्रामहून मुंबईत आला होता. त्यावेळची आठवण त्याने सांगितली. एवढंच नव्हे तर आज सुपरस्टार असलेला राजकुमार राव हा एकेकाळी शाहरुख खानच्या घराबाहेर दिवसभर उभा रहायचा.
काय म्हणाला राजकुमार राव ?
अलीकडेच राजकुमारने एका पॉडकास्टमध्ये सहभागी झाला होता. तो म्हणाला, तेव्हा मी फक्त 16 वर्षांचा होतो जेव्हा मी आणि माझा 12 वर्षांचा भाऊ, आम्ही दोघे स्वप्ननगरी मुंबईत आलो होतो. पैशांअभावी मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर रात्र काढावी लागल्याचेही त्याने सांगितले. मी जेव्हा मुंबईत आलो तेव्हा शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी दिवसभर मन्नतच्या बाहेर उभा रहायचो. जेव्हा त्याच्या भावांना तिथे उभे राहण्याचा कंटाळा यायचा तेव्हा राजकुमार म्हणायचा, (कंटाळून कसं चालेल) यासाठीच तर आपण ( शाहरुखला पाहण्यासाठी) आलो आहोत आपण.
शाहरुखशी पहिली भेट कशी झाली ?
शाहरुखशी पहिली भेट कशी झाली याबद्दलही राजकुमार राव बोलला. ‘सिटीलाइट’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान मेहबूब स्टुडिओमध्ये शाहरुख खासोबत भेट झाली होती. “मला त्याला भेटायचे होते. सुरुवातीला मला खूप भीती वाटायची. मी तिथे जाहिरातीसाठी आलेल्या शकुन बत्रा यांना मेसेज केला. त्यानंतर ते आले आणि मला म्हणाले की शाहरुख मला बोलावत आहे.” मी लगेच माझी ओळख करून देण्याची तयारी केली. मला वाटले की मी त्यांना सांगेन की माझे नाव राजकुमार राव आहे आणि मी FTII मध्ये शिकलेला अभिनेता आहे.” पण नंतर मला समजलं की शाहरुखला माझ्याबद्दल आधीच सगळं माहीत होतं. ती भेट अविस्मरणीय होती, असंही अभिनेत्याने सांगितलं.