अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला करण्यात आला आहे. घरात शिरलेल्या चोराकडून सैफ अली खानवर हल्ला करण्यात आला आहे. सध्या त्याला उपचारांसाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री 3 च्या सुमारास ही घटना घडली. वांद्रे येथील राहत्या घरात सैफ आली खानवर चोराने चाकू हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या सैफ अली खानला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर सर्जरी सुरू आहे.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वांद्रे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदवण्याती प्रक्रिया सुरू असून आरोपीच्या शोधासाठी, अटकेसाठी अनेक पथकं तयार करण्यात आली आहे.
करीना आणि मुलं सुरक्षित
दरम्यान या सैफ अली खान याची पत्नी , अभिनेत्री करीना कपूर खान तसेच त्यांची मुलं सुरक्षित आहे. हल्ल्याच्या या घटनेबाबत अद्याप कोणतेही अधिकृत स्टेटमेंट जारी करण्यात आलेले नाही. प्राथमिक तपासानंतर पोलीस लवकरच या प्रकरणाची सविस्तर माहिती देऊ शकतात. घराभोवती लावण्यात आलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.
नेमकं काय घडलं ?
मध्यरात्री 3 च्या सुमारास हा हल्ला झाला तेव्हा सैफ अली खान हा कुटुंबियांसोबत घरी झोपला होता. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री एक चोर सैफच्या घरात घुसला. त्याचवेळी घरातील काही नोकरांना हालचालीमुळे जाग आली, चोराला पाहून त्यांनी आरडाओरडा केला. त्यांच्या आवाजाने सैफही झोपेतून जागा झाला, तो लागलीच बाहेर आला. समोर चोर पाहून सैफने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा दोघांमध्ये बरीच झटापट झाली. त्याचदरम्यान चोराने सैफवर चाकूने हल्ला केला, त्यामध्ये सैफ जखमी झाला. कुटुंबीय आणि घरातील नोकर-चाकर तातडीने सैफला लीलावती रुग्णालयात घेऊन गेले, तेथे त्याच्यावर सध्या सर्जरी सुरू आहेत. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
दरम्यान याप्रकरणी पोलिसांनीही काही माहिती दिली आहे. सैफ अली खान आणि चोरामध्ये झटापट झाल्याची माहिती खरी आहे. दोघांमध्ये झालेल्या झटापटीत सैफ अली खान जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराचा तपास सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी फोनवरून सैफच्या प्रकृतीविषयी माहिती घेतली आहे.
पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरू असून सैफ अली खानच्या घरात काम करणाऱ्या आणि सुरक्षेचे काम करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसेच त्यांचे मोबाईलही जप्त करण्यात आले आहे. काही लोकांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेले आहे.