राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर शनिवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. त्यामध्ये सिद्दीकी यांचा मृत्यू झाल्याचे समजते. मात्र या बातमीमुळे फक्त मुंबईतच नव्हे तर संपूर्ण राज्यात खळब माजली आहे. राजकीय क्षेत्रच नव्हे तर संपूर्ण बॉलिवूडलाही या घटनेमुळे मोठा धक्का बसला आहे. बाबा सिद्दीकी हे केवळ राजकारणीच नव्हे तर बॉलिवूडमध्येही त्यांचं नाव प्रसिद्ध होतं. अभिनेता सलमान खान याच्याशी त्यांची खूप जुनी मैत्री होती. दरम्यान बाबा सिद्दीकी यांच्यावरील गोळीबाराची आणि त्यांच्या मृत्यूची भयानक बातमी समजताच सलमान खान याने बिग बॉस (हिंदी) 18 चे शूटिंग अचानक कॅन्सल केले. या रिॲलिटी शो चे शूटिंग सुरू असताना मध्यातच सलमानला सिद्दीकी यांच्यावरील हल्ल्याची बातमी समजली आणि तत्काळ शूटिंग थांबवत लमान खान लीलावती रुग्णालयाच्या दिशेने रवाना झाला अशी माहिती मिळत आहे.
अवघ्या 7 महिन्यांपूर्वी काँग्रेसला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केलेले बाबा सिद्दीकी यांच्यावरील गोळीबाराने संपूर्ण राज्य हादरलं. शनिवारी रात्री 9.30 च्या सुमारास निर्मलनगर येथे ही घटना घडली. सिद्दीकी यांच्यावर 3-4 गोळ्या झाडण्यात आल्या. त्यापैकी एक गोळी ही त्यांच्या छातीला लागली. लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतलं असून तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. क्राईम ब्रांच मुंबईचे अधिकारी या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
बॉलिवूड कलाकारांची रुग्णालयात धाव
बाबा सिद्दीकी यांच्यावरील हल्ल्याची बातमी समजताच बॉलिवूडलाही धक्का बसला. चित्रपटसृष्टीत सिद्दीकी यांचे अनेक मित्र असून दरवर्षी सिद्दीकी यांच्यातर्फे देण्यात येणाऱ्या इफ्तार पार्टीला अनेक सेलिब्रिटी हजेरी लावतात, तसेच टीव्ही स्टार्सही या पार्टीसाठी आवर्जून येतात. शनिवारी रात्री सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाल्याचे आणि रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाल्याचे समजताच अनेक सेलिब्रिटींनी लीलावती रुग्णालयाच्या दिशेने धाव घेतली. बाबा सिद्दीकी यांचा जवळचा मित्र आणि प्रसिद्ध अभिनेता संजय दत्त सर्वप्रथम लीलावतीमध्ये पोहोचला. त्यानंतर थोड्यावेळाने अभिनेत्री शिल्पा शेट्टी पतीसह रुग्णालयात पोहोचली. बाबा सिद्दीकी यांचा अनेक वर्षांपासूनचा मित्र असलेला सलमानही थोड्याच वेळात लीलावतीमध्ये दाखल होईल. बिग बॉसचे शूटिंग अर्ध्यात थांबवून तो रुग्णालयात पोहोचण्यासाठी निघाला.
सलमानसोबत खास नातं
बाबा सिद्दीकी आणि सलमान खान यांचे खूप जवळचे नातं होतं. ते दोघंही अनेकदा एकत्र दिसायचे. अनेक समाजसेवेच्या कामातही सलमान बाबांसोबत दिसायचा. सलमान खान हा केवळ त्याच्या चित्रपटांमुळेच नव्हे तर अनेक वादांमुळेही चर्चेत असतो. हिट अँड रन केस असो किंवा काळवीटाची शिकार, सलमानच्या अनेक कृत्यांनी खळबळ माजवली. याप्रकरणात सलमानला तुरूंगातही जावं लागलं होतं. जेव्हा जेव्हा सलमान अडचणीत सापडला, तेव्हा बाबा सिद्दीकी नेहमीच त्याच्यासोबत ठामपणे उभे राहिल्याचे दिसले. त्याच्या प्रत्येक केसच्या सुनावणीदरम्यान बाबा सिद्दीकी कोर्टात हजर होते, किंवा ते सलमानच्या कुटुंबियांची मदत करताना दिसले.