अभिनेता सलमान खान याचे वडील आणि प्रसिद्ध लेखक सलीम खान यांना धमकी देण्यात आली आहे. लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने त्यांना पुन्हा धमकी मिळाली आहे. सलमान खानचे वडील,सलीम खान हे मॉर्निंग वॉकसाठी गेले असताना एका अज्ञात महिलेकडून ही धमकी देण्यात आली आहे.’लॉरेंस बिश्नोई को भेजूं क्या?’ असा सवाल विचारत सलीम यांना धमकावण्यात आले.
याप्रकरणी सध्या बांद्रा पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाच्या तपास करत आहे. दरम्यान, अज्ञात महिलेकडून पहिल्यांदाच सलीम खान यांना धमकी मिळाली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ही महिला कोण आहे? कुठून आली? तिने धमकी कशी दिली? असे सवाल या निमित्ताने उपस्थित राहिले आहेत. दरम्यान, या परिसरातील सीसटीव्ही फुटेज चेक करण्यात येणार असून परिसरातील नागरिकांची चौकशी करून माहिती घेण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
यावर्षी काही महिन्यांपूर्वीच अभिनेता सलमान खान याच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता. वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील सलमानच्या घरावर दोन तरूणांनी पहाटे गोळीबार केला होता, यामुळे मोठी खळबळ माजली होती. लाॅरेन्स बिश्नोईच्या भावानेच या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली होती.
यापूर्वी जूनमध्ये सलमान खान आणि सलीम खान यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यांच्या घरी पत्र पाठवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यावर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला होता. तसेच सलमान आणि सलीम खान यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. सलमान आणि सलीम खान यांच्या सेक्युरिटीच्या बेंचवर हे धमकावणारं पत्र मिळालं होतं. सलीम खान त्याच मार्गावरून रोज सेक्युरिटी स्टाफसोबत मॉर्निंग वॉकसाठी जात असतात. मात्र, तिथे ते फार वेळ थांबत नाहीत.
गंभीर परिणामांना सामोरे जावं लागेल, असं या धमकावणाऱ्या पत्रात म्हटलं होतं. तुमची अवस्था मुसेवाला सारखी करण्यात येईल, असंही या पत्रात म्हटलं होतं. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली होती. तसेच स्थानिक नागरिकांची चौकशी करून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला होता.