मुंबई : महाराष्ट्रात विविध नाटकांचे प्रयोग चांगलाचे रंगले असून उकाड्यातही नाट्यरसिक नाटक पाहण्यासाठी आवर्जून नाट्यगृहांमध्ये येताना दिसत आहेत. मात्र नाट्यगृहांमधील गैरसोयींचा त्रास प्रेक्षक आणि नाटक सादर करणारे कलावंत यांनाही बसतो. अनेक कलाकार वेळोवळी याबद्दल आवाज उठवत असतात, सोशल मीडियाच्या माध्यमातूनही त्यांची नाराजी नोंदवत असतात. अशीच एक पोस्ट अभिनेता वैभव मांगलेनीही (Vaibhav Mangle) लिहीली असून ती बरीच व्हायरल झाली आहे. राज्यातील नाट्यगृहांच्या दुरावस्था कथन करणारी ही पोस्ट (social media post) त्यांनी लिहीली असून याद्दल दाद तरी कुणाकडे मागायची असा सवालही मांगले यांनी विचारला आहे.
काय म्हणाले वैभव मांगले ?
नाट्यगृहातील जास, बंद एसी, उकाडा यासंदर्भात वैभव यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहीली आहे. ‘संज्या छाया’ या त्यांच्या नाटकादरम्यान त्यांना जो त्रास सहन करावा लागला, त्या अनुभवाबद्दल त्यांनी या पोस्टमध्ये लिहीले आहे. त्यांची ही पोस्ट जशीच्या तशी त्यांच्याच शब्दांत वाचूया..
‘ पुणे , छ.संभाजीनगर , नाशिक येथे प्रयोग झाले संज्या छायाचे . एका हि ठिकाणी वातानुकुलीत यंत्रणा काम करत नव्हती . रंग मंचावर एवढ्या प्रकाशात काम करताना प्रचंड उकाड्यात अतोनात त्रास झाला . प्रेक्षक डास आणि प्रचंड उकाड्यात( विशेषतः बालगंधर्व पुणे खूप डास आणि उकाडा , कोथरूड यशवंतराव .. उकाडा ) ) प्रयोग पहात होते . एक मर्यादे नंतर नाशिक मध्ये रसिकांचा राग ,हतबलता अनावर झाली त्यांनी गोंधळ केला . तिकिटाचे पैसे परत घ्यावे का याचा विचार करू लागले . पण आपण शो मस्ट गो ऑन (show must go on) वाले लोक . आम्ही विनंती केली की आम्हाला ही त्रास होतोच आहे .. इथे येई पर्यंत माहित नव्हतं की एसी नाहीयेत. आमच्या निर्माते दिलीप जाधव यांनी 17 आणि 27 चे शो रद्द केले . त्या हवेचे आवागमन नसलेल्या उकाड्यात प्रयोग पार पडला . कालिदासला तर उत्तर द्यायला ही अधिकारी जागेवर नव्हता . या सगळ्यात सगळ्यांची होलपट होतेय . कुणी कुणी आणि कुठे कुठे कशी दाद मागावी ??? विचारलं तर सांगतात एसी चालू आहे पण खूप गर्मी असल्याने एसी यंत्रणा नीट काम करत नाही . पावसाळ्यात आणि हिवाळ्यात ही समस्या येत नाही . काय बोलावं या सगळ्यावर वर .???????? ‘ असा प्रश्न मांगले यांनी विचारला आहे.
वैभव यांनी लिहिलेल्या या फेसबुक पोस्टवर बऱ्याच कमेंट्स आल्या असून अनेक नेटीजन्सनी त्यांच्या मताशी सहमती दर्शवली आहे
‘ खरं तर सरकारमधील आणि प्रशासनातील लोक यांना फक्त आपापला स्वार्थ साधण्यापलीकडे आणि खिशे भरण्यापलीकडे काही काही बघायचंच नाहीये.. ‘ अशी कमेंट एका युजरने केली आहे. तर ‘ हे अत्यंत दुर्दैवी आहे. कलाकार आणि प्रेक्षक दोघांसाठीही ….किती सरकारे आली आणि गेली पण रंगभूमीच्या अडचणी काही संपत नाही’ अशी कमेंटही एकाने केली आहे. तर एका युजरने ‘ निर्लज्ज आणि निर्ढावलेले झाले आहेत हे सगळे. महापालिकांकडून निधी मंजूर होत असतो नाट्यगृह देखभालखर्चासाठी वेळोवेळी…तो नेमका मुरतो कुठं हे बघायला पाहिजे.’ अशा शब्दांत त्यांचा राग व्यक्त केला.