टाइम मॅगझीनने बुधवारी 2024 सालातील जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींच्या नावाची यादी जाहीर केली. यामध्ये बॉलिवूडमधील नामवंत अभिनेत्री आलिया भट्ट हिच्या नावाचा समावेश आहे. आलिया व्यतीरिक्त या लिस्टमध्ये कुस्तीपटू साक्षी मलिक, वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष अजय बंगा, मायक्रोसॉफ्टचे CEO सत्या नडेला आणि अभिनेता देव पटेल यांच्या नावाचाही समावेश आहे.
तसेच या लिस्टमध्ये या यादीत अमेरिकेच्या एनर्जी लोन प्रोग्राम ऑफिस डायरेक्टर जिगर शाह, येल विद्यापीठातील खगोलशास्त्र आणि भौतिकशास्त्राचे प्राध्यापक प्रियमवदा नटराजन यांचाही समावेश आहे. याशिवाय भारतीय वंशाच्या रेस्टॉरंटच्या मालक अस्मा खान आणि दिवंगत रशियन विरोधी पक्षनेते अलेक्सी नवलनी यांच्या पत्नी युलिया नवलनाया यांनाही या लिस्टमध्ये स्थान देण्यात आले आहे.
आलियाच्या शिरपेचात मानाचा तुरा
टाइम मॅगझीनच्या प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत स्थान मिळणं ही मोठी मानाची गोष्ट आहे. अवघ्या 12 वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या आलिया भट्टचे नाव आजच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये घेतले जाते. तिचे नाव टाइमच्या यादीत येणं ही एक महत्वाची गोष्ट आहे.
अभिनेत्री सोनी राझदान आणि दिग्दर्शक महेश भट्ट यांची कन्या असलेल्या आलियाचा जन्म 15 मार्च, 1993 साली मुंबईमध्ये झाला. सोनी राझदान ही महेश भट्ट यांची दुसरी पत्नी आहे. प्रसिद्ध अभिनेत्री पूजा भट्ट ही आलियाची सावत्र बहीण आहे.
12 वर्षांत अनेक हिट चित्रपट
आलियाला लहानपणापासूनच अभिनेत्री बनायचं होतं. 2012 साली तिने करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द ईअर’ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत वरूण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनीही डेब्यू केलं. त्यानंतर आलियाने 2014मध्ये हायवे चित्रपटात काम केलं, तिच्या भूमिकेचं, अभिनयाचं खूप कौतुकही झालं. नंतर आलियाची गाडी सुसाट सुटली. 2 स्टेट्स, हंप्टी शर्मा की दुल्हनिया, कपूर अँड सन्स, उड़ता पंजाब, डियर जिंदगी, बद्रीनाथ की दुल्हनिया,अशा अनेक चित्रपटांत काम करत आलियाने यंग जनरेशनच्या मनात खास स्थान निर्माण केलं.
2021 साली संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केलेला गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट आलियाच्या करिअरसाठी गेम चेंजर ठरला. खतरनाक लेडी डॉनच्या भूमिकेत आलिया भटला इमॅजिन करणे कठीण होते. पण आलियाने ही भूमिका अत्यंत उत्तमपणे निभावली आणि यशाची नवीन शिखरे गाठली. या चित्रपटासाठी आलियाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं. आता तिची टाइम मॅगझीनच्या प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत निवड झाल्यामुळे तिच्या शिरपेचात मानाचा तुरा खोचला गेला आहे.