भारत वि न्यूझीलंड यांच्या सध्या 3 कसोटी सामन्यांची मालिका सुरू असून पहिला सामना जिंकून न्युझीलंडने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडने विजयासाठी मिळालेलं 107 धावांचं आव्हान 2 विकेट्स गमावून पूर्ण केलं. न्यूझीलंडने या विजयासह 36 वर्षांची प्रतिक्षा संपवत 1988 नंतर भारतात पहिला विजय मिळवला. या मालिकेतील दुसरा सामना 24 ऑक्टोबरपासून पुण्यात खेळण्यात येणार आहे. भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा यांची जोडी खूपच लोकप्रिय असून ते स्टार कपलपैकी एक आहेत. त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्याचीही चाहत्यांना खूप इच्छ असते. त्यांचा एक नवा व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला आहे. त्यामध्ये विराट-अनुष्का भजन-कीर्तनांत दंग झाल्याचे दिसत आहेत.
करवा चौथच्या दिवशी विराट-अनुष्का झाले स्पॉट
20 ऑक्टोबर रोजी करवा चौथच्या दिवशीच विराट-अनुष्का मुंबईत स्पॉट झाले. मात्र यावेळी ते नेस्को येथे कृष्णा दास यांच्या कीर्तनासाठी आले होते. पहिल्या रांगेत बसलेले विराट-अनुष्का भजनात अतिशय दंग झालेले दिसले. त्यांचाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या वेळी अनुष्का पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली. तर विराट कोहली अतिशय कॅज्युअल, साध्या कपड्यांमध्ये , डोक्यावर लाल रंगाची हॅट घालून बसला होता.
टाळ्या वाजवत, हसतमुखाने बसलेली अनुष्का कीर्तनाचा आनंद घेत तल्लीन झाली होती. तर तिच्या शेजारीच शांतपणे डोळे मिटून बसलेला विराट जप करण्यात मग्न होता. यापूर्वी ते परदेशात असताना, लंडनमध्येही अशा अनेक कार्यक्रमांत सहभागी झाले. त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
The way Virat is enjoying the Kirtan, he has totally lost in this moment 🥹❤️ pic.twitter.com/mVdnsWNxxy
— Virat Kohli Fan Club (@Trend_VKohli) October 21, 2024
पुण्यात होणार दुसरा सामना
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यीतील उर्वरित दोन्ही सामने हे महाराष्ट्रात होणार आहेत. दुसरा कसोटी सामना हा 24 ते 28 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. या सामन्याला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर तिसरा आणि अंतिम सामना हा मुंबईत होणार आहे.
भारताने आतापर्यंत पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर दोन कसोटी सामने खेळले आहेत. 2017 मध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून 333 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. हा पराभव विराट कोहलीच्या कर्णधारपदाच्या दोन कसोटी पराभवांपैकी एक होता. मात्र 2019 मध्ये झालेल्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एक डाव आणि 137 धावांनी विजय मिळवला.