धकधक गर्ल माधुरी दीक्षित नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. कधी तिच्या सिनेमांमुळे, कधी तिच्या फिटनेसमुळे तर कधी तिच्या नवऱ्याच्या आरोग्याच्या सल्ल्यामुळे. माधुरीची प्रत्येक बातमी तिचे चाहते वाचत असतात. तिला फॉलो करण्याचा प्रयत्न करत असतात. आता सध्या माधुरी एका कारणाने चर्चेत आहे. माधुरीने चक्क मोठी गुंतवणूक केली आहे. माधुरीने शेअर मार्केटमध्ये मोठा डाव लावला आहे. एका कंपनीचा आयपीओ येण्याआधीच माधुरीने या कंपनीत मोठी गुंतवणूक केली आहे.
माधुरी दीक्षितने हिव्ह हॉस्टेल ब्रँड चालवणारी कंपनी कोलस्टे प्रायव्हेट लिमिटेडमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. या कंपनीने आयपीओ काढण्यापूर्वी खासगी प्लेसमेंटद्वारे 11.5 कोटीचा निधी उभा केला आहे. त्यात माधुरी दीक्षितनेही गुंतवणूक केली आहे. तसेच अभिनेत्री अमृता रावनेही मोठी गुंतवणूक केली आहे. या कंपनीतील फंडिंग फेरीनंतर माधुरीने त्यात 0.44 टक्के भागिदारी ठेवली आहे. तर अमृता रावने नेमकी किती गुंतवणूक केली, याची माहिती मिळू शकलेली नाही.
अजून कुणाची गुंतवणूक?
याच कंपनीत अंकित मित्तल यांनी 1.58 टक्के भागिदारी केली आहे. आयपीओपूर्वीच एखाद्या कंपनीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक झाल्याने या आयपीओकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कोलस्टे प्रायव्हेट लिमिटेडचा आयपीओ लिस्टेड झाल्यानंतर त्यावर गुंतवणूकदारांच्या उड्या पडणार असल्याचंही सांगितलं जात आहे. तसेच अनेकजण आयपीओनंतरही शेअर विकत घेण्यावर भर देतील असंही सांगितलं जात आहे. त्यामुळे या कंपनीच्या आयपीओच्या लॉन्चिंग डेटकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
पुढील वर्षी आयपीओ
या कंपनीने प्लेसमेंटद्वारे आतापर्यंत 1.16 लाख शेअर्स जारी केले आहेत. पुढील वर्षी आयपीओसाठी अर्ज करण्याची या कंपनीची योजना आहे. त्याचीच ही तयारी सुरू आहे. नवीन भांडवलाच्या माध्यमातून मार्केटमध्य हातपाय पसरण्याचं काम ही कंपनी करत आहे. या कंपनीला अधिक विस्तारायचं असल्यानेच त्यांनी ही तयारी सुरू केल्याचं सांगितलं जात आहे.
तिप्पट नफा
या कंपनीने 2024 या आर्थिक वर्षात 1.46 कोटीचा नफा कमावला आहे. या कंपनीची वार्षिक उलाढाल 40.73 कोटी इतकी आहे. 2023मध्ये या कंपनीचा एकूण महसूल 29.5 कोटी रुपये होता. या कंपनीने गेल्या वर्षी 65 लाख रुपयांचा नफा मिळवला होता. त्या तुलनेत 2024मध्ये कंपनीने तिप्पट नफा कमावल्याचं समोर आलं आहे.
2019मध्ये अग्रवाल बंधू म्हणजे भरत अग्रवाल आणि सिद्धार्थ अग्रवाल यांनी ही कंपनी सुरू केली होती. पीजी हाऊसमधील आव्हानांचा सामना केल्यानंतर त्यांनी व्हिव्ह या नावाने हॉस्टेल सुरू केले होते. मुंबई, नोएडा, अहमदाबाद, डेहराडून आणि जयपूरमध्ये कंपनीचे हॉस्टेल आहेत. एकूण 2600 खाटांचे ही हॉस्टेल असल्याचं सांगितलं जात आहे.