बॉलिवूड अभिनेत्री रिमी सेन हिची एका मित्राकडून फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. रिमी हिने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘हंगामा’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने धूम, गोलमाल, दिवाने हुआ पागल, गरम मसाला, बागबान, क्योंकी, फिर हेराफेरी अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले. याच रिमी सेन हिची एका मित्राने तब्बल 4 कोटी 41 लाखांची फसवणूक केली आहे. अंधेरी येथील एका जिममध्ये रिमी आणि रोनक व्यास यांची ओळख झाली. या ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. जतिन याने नवा व्यवसाय सुरु करत आहे. रिमी हिने कंपनीत गुंतवणूक केल्यास 30 टक्के परतावा करण्याची ऑफर दिली. रिमीने ती ऑफर स्वीकारली मात्र पैसे गुंतवल्यानंतर त्याने तिची फसवणूक केली. त्यामुळे तिने खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
फसवणुकीच्या या प्रकरणावर मौन भंग करताना रिमी सेन म्हणाली, ‘सुमारे 3 वर्षांपूर्वी रोनक याला जिममध्ये भेटले. तो माझा चांगला मित्र बनला. पण, भावनिकदृष्ट्या त्याने माझा विश्वासघात केला. त्याने मला एका व्यवसायात चांगला परतावा देण्याचे आश्वासन दिले. त्याच्यावर विश्वास ठेवून 20 लाख रुपये त्याला दिले. 20 लाखांवर तो 9 टक्के व्याज देत होता. त्यानंतर त्याने 12 ते 15 टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवून आणखी रक्कम भरण्यास सांगितले. मी ही रक्कम भरली आणि हळूहळू ती रक्कम 4.14 कोटींवर गेली. त्याने फक्त 5 ते 6 लाख रुपयांचा पहिला हप्ता दिला. त्यानंतर कोविडचे कारण देत त्याने पैसे देण्याचे टाळले. कधी वडील आजारी तर कधी अन्य कारणे सांगून पैसे देण्याचे टाळत होता. आमची मैत्री घट्ट असल्याने त्याच्यावर विश्वास होता. पण, जेव्हा तो अनेक महिने कारणे देऊ लागला. त्यानंतर या कंपनीसंदर्भात चौकशी केली तेव्हा अशी कोणतीही कंपनी सुरु नसल्याचे कळाले. रोनक याने फसवणूक केल्याचे लक्षात येताच खार पोलिसात तक्रार दाखल केली असे तिने सांगितले.
रोनक याने अहमदाबादमध्येही अनेक लोकांची फसवणूक केल्याचे ऐकले आहे. माझे बरेच पैसे या प्रकरणात गुंतले आहेत. हा भाग थोडा वैयक्तिक आहे. पण, त्याने माझ्यासोबत जे केले त्याची जाणीव इतर लोकांनाही व्हावी. मुंबईनंतर तो दुसरे शहर निवडेल. तिथे घर भाड्याने घेईल. चांगली कार भाड्याने घेईल. त्याचा मोठा व्यवसाय दाखवून लोकांना फसवेल. त्याने आणखी कुणाची फसवणूक करू नये यासाठी हा गुन्हा दाखल केला असेही रिमीने स्पष्ट केले.
खार पोलिस स्टेशनमध्ये सुमारे 1 ते दीड वर्षांपूर्वी एफआयआर दाखल केला होता. अलीकडेच मला CID युनिट 9 कडून फोन आला की माझी केस तिकडे ट्रान्सफर झाली आहे. दया नायक हे प्रकरण हाताळत आहेत. ते मला न्याय मिळवून देतील अशी खात्री आहे. माझे वकील मिलन देसाई यांनी या प्रकरणाचा तपास जलदगतीने करण्याचे आदेश मिळावेत यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
न्यायमूर्ती रेवती मोहिते आणि श्रीमती देशपांडे यांनी खटला पुढे नेण्यात खूप मदत केली. हायकोर्टाने रोनक याची संपत्ती जप्त करण्यास सांगितले आहे. पण, त्याची भारतात कोणतीही मालमत्ता नाही. त्याने पत्नी किंवा आईच्या नावाने वस्तू खरेदी केल्या आहेत. एक दोन दिवसांत हायकोर्टात आरोपपत्र दाखल केले जाईल. त्याला अटक करण्याचे कॉग्निसेबल वॉरंट जारी केले जाईल. तो परदेशात असल्यास ते इंटरपोलकडे पाठवणे हे पोलिसांचे काम आहे असेही रिमी सेन हिने सांगितले.