मुंबई : छोट्या पडद्यावरील मालिकांपासून ते बॉलिवूड मध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम करणारे अभिनेता नितेश पांडे (Nitesh Pandey) यांचे दु:खद निधन झाले. २४ मे रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. वयाच्या 51 व्या वर्षी कार्डिॲक अरेस्टने त्यांचं निधन झालं. नाशिकजवळील इगतपुरी याठिकाणी पहाटे 2 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शूटनिमित्त ते तिथे गेले होते. कार्डिॲक अरेस्ट इतका तीव्र होता की नितेश यांनी जागीच प्राण गमावल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या जाण्याने चाहते आणि सहकारी देखील दु:खी झाले आहेत दिसत आहेत. अनुपमा फेम अभिनेत्री रुपाली गांगुली (Rupali Ganguly) यांनाही त्यांच्या निधनाचा धक्का बसला आहे.
रुपाली गांगुली आणि नितेश पांडे दोघेही एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. टीव्ही सीरियल अनुपमामध्ये रुपाली मुख्य भूमिकेत असताना नितेशही या शोमध्ये एक महत्वाची भूमिका निभावत होते. या शोमध्ये ते धीरज कपूर नावाची व्यक्तिरेखा साकारत होते. मात्र आज नितेश यांच्या निधनाची बातमी रुपालीला समजताच तिला धक्काच बसला. तिने त्यांच्या आठवणींना उजाळा देत या महिन्याच्या सुरुवातीलाच दोघेही भेटल्याचे नमूद केले.
तीन आठवड्यांपासून बोलणं झालं नव्हतं
रुपाली गांगुलीने सांगितले की, तिने या महिन्याच्या सुरुवातीला नितेशला पाहिले होते. एका चित्रपटाच्या गेट टूगेदरसाठी ती जात होती, तेव्हा तिने नितेश पांडेची कार निघताना पाहिली. जेव्हा अभिनेत्रीने त्याला फोन केला तेव्हा त्याने सांगितले की तो कार घेऊन येईल. मात्र रुपालीने घरी जायला सांगितले. आणि पुढल्या आठवड्यात भेटण्याचे आश्वासनही दिले. या गोष्टीला आता तीन आठवडे झाले आहेत. पण मी त्याला पुन्हा कधीच भेटू शकणार नाही, याची मला तेव्हा कल्पनाच नव्हती.
नितेश नेहमी संपर्कात रहायचा
रुपाली गांगुली यांनी असेही सांगितले की डेलनाज आणि साराभाई मालिकेतील कलाकारांव्यतिरिक्त नितेश हा तिचा मनोरंजन क्षेत्रातील एकमेव मित्र होता जो नेहमी तिच्या संपर्कात होता. मुलगा रुद्रांशच्या जन्मानंतरही तो भेटायला आला होता, असे सांगत रुपालीने त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
नितेश पांडे हे मनोरंजन क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव होते. अनेक टीव्ही कार्यक्रमांसोबतच ते चित्रपटांमध्येही दिसले. त्यांनी शाहरुख खानच्या ओम शांती ओम आणि सलमान खानच्या दबंग 2 मध्येही काम केले होते.