पश्चिम बंगालमध्ये 9 ऑगस्ट रोजी एका ज्युनियर डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली असून देशाच्या कानाकोपऱ्यातून न्यायाची मागणी होत आहे. कोलकात्यातही निदर्शने होत आहेत. तसेच अनेक लोकांनी सोशल मीडियावरही या घटनेबाबत आवाज उठवला आहे, त्यामध्ये बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींचा समावेश आहे. प्रीती झिंटा, समंथा रुथ प्रभू, जेनेलिया डिसूझा, क्रिती सेनॉन, आलिया भट्ट आणि हृतिक रोशन यांनी या घटनेनंतर संताप व्यक्त केला. त्यानंतर बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याची पत्नी आणि अभिनेत्री, लेखिका ट्विंकल खन्नानेही या प्रकरणी आपली प्रतिक्रिया शेअर केली आहे.
काल एकीकडे संपूर्ण देश 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना दुसरीकडे देशाच्या एका कोपऱ्यातून न्यायाची मागणी होत होती. दरम्यान, प्रसिद्ध अभिनेत्री आणि लेखिका ट्विंकल खन्नाने आवाज उठवला आहे आणि तिच्या 12 वर्षांच्या मुलीसाठी एक पोस्ट शेअर केली आहे.
कदाचित तू कधीच परतणार नाही..
तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर करताना ट्विंकलने लिहिले की, “मी या देशात राहून 50 वर्षे झाली आहेत आणि आजही मी माझ्या मुलीला तेच शिकवत आहे, जे मला माझ्या लहानपणी शिकवलं गेलं. एकटीने बाहेर जाऊ नका असं मला सांगण्यात आलं होतं. मग ती शाळा असो किंवा बाग … कोणत्याही पुरुषासोबत कधीही एकटं जाऊ नको, तो तुझा काका असो किंवा चुलत भाऊ किंवा मग मित्र का असेना.. एकट्याने जाऊ नका कारण कदाचित तू कधीच परत येऊ शकणार नाहीस.”
स्वातंत्र्यदिनी केली पोस्ट
ट्विंकल खन्नाच्या या पोस्टवर अनेक लोकांनी कमेंट्स करत प्रतिक्रिया देत कलकत्ता रेप-मर्डर प्रकरणी संताप व्यक्त केला आहे. या पोस्टशी आम्ही रिलेट करू शकलो, कारण आमच्या जीवनातही अशा घटना घडतात आणि हे निराशाजनक आहे, असं एकाने लिहीलं. ट्विंकल खन्नाने आपल्या मुलीचे उदाहरण देत हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे, ट्विंकलची मुलगी नितारा सध्या 12 वर्षांची आहे. अनेक सेलिब्रिटींनी या घटनेची तुलना निर्भया हत्याकांडाशी केली आहे. ट्विंकल व्यतिरिक्त इतर अनेक सेलिब्रिटींनी या विषयावर भावना व्यक्त केल्या आहेत.
‘काश मैं भी एक लड़का होती’
झल्ली बनकर उड़ती दौड़ती, सारी रात दोस्तों के साथ दौड़ती फिरती … काश मैं भी एक लड़का होती, – या ओळी लिहीत अभिनेता आयुष्मान खुराना यानेही देशातील महिलांच्या स्थितीवर आवाज उठवला आहे. या कवितेद्वारे त्याने कलकत्ता येथील परिस्थितीवरही भाष्य केलं. त्याच्याशिवाय आलिया भट्ट, जेनेलिया देशमुख यांसारख्या इतर अनेक सेलिब्रिटींनी या घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे.