मुंबई | 21 फेब्रुवारी 2024 : आजच्या काळात बॉलिवूड स्टार्सना लोकांशी जोडून ठेवण्यासाठी सोशल मीडिया बराच फायदेशीर ठरत आहे. अनेक स्टार्स सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहून, चाहत्यांशी टचमध्ये असतात. विविध पोस्टही शेअर करतात. मात्र प्रत्येक गोष्टीचे जसे फायदे असतात, तसचे तोटेदेखील असू शकतात. हाच सोशल मीडिया काही वेळा स्टार्ससाठी अडचणीचाही ठरू शकतो. अनेक वेळा बॉलिवूड स्टार्सच्या नावाने फेक आयडी बनवून त्यांचा गैरवापर केला जात असल्याचे उघड झाले आहे. त्यामध्ये आता आणखी एका नामवंत अभिनेत्रीचे नाव जोडले गेले आहे. प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन हिलाही ठगांनी चांगलाच दणका दिला आहे. त्याप्रकरणी विद्याने पोलिसातही धाव घेतली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण ?
विद्या बालन हिने नुकतीच, खार पोलिस स्टेशनमध्ये एका अज्ञात व्यक्तीविरोधात FIR दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विद्या बालन हिच्या नावे सोशल मीडियावर बनावट अकाऊंट बनवण्यात आले होते. त्या बनावट अकाऊंटच्या आधारे ती अज्ञात व्यक्ती लोकांना नोकरीचे आश्वासन देत होती आणि त्यासाठी पैशांची मागणीदेखील करत होती. तसेच बनावट ईमेल आयडी बनवून काहीजणांना संपर्क करण्याचा प्रयत्न झाल्यानंतर विद्या बालनपर्यंत ही बातमी पोहोचली आणि बनावट अकाऊंटबद्दलही तिला समजलं. त्यानंतर तिने त्या अज्ञात व्यक्तीविरोधात तातडीने ॲक्शन घेतली. तिने खार पोलिसांत जाऊन या फसवणुकीप्रकरणात एफआयआर दाखल केली आहे.
खरंतर, आयटी कायद्याच्या कलम 66 (सी) अंतर्गत खार पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. याचा तपासही सुरू करण्यात आला आहे. या अज्ञात व्यक्तीबाबत सध्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र, यानंतर विद्या बालन हिने , तिच्या चाहत्यांना अशा बनावट अकाऊंटपासून सावध राहण्यास सांगितले आहे. स्टार्सच्या नावे फसवणुकीचे हे काही पहिले प्रकरण नाही. याआधीही अनेक स्टार्सच्या नावाने फेक अकाउंट तयार करण्यात आले. तसेच लोकांकडून पैशांची मागणीही करण्यात आली होती.
मंजुलिकाच्या भूमिकेत पुन्हा दिसणार विद्या
विद्या बालन हिच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती आता ‘भूल भुलैया 3’ मुळे पुन्हा चर्चेत आली आहे. या चित्रपटात ती पुन्हा एकदा मंजुलिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र विद्या बालन हिच्या नावाचीच चर्चा सुरू आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून अभिनेता कार्तिक आर्यनही त्यामध्ये मुख्य भूमिकेत झळकणार आहे.