मुंबई : राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण करणारा अभिनेता भाऊसाहेब शिंदे (Bhausaheb Shinde) पुन्हा एकदा एका नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने प्रकाशझोतामध्ये आला आहे. पदार्पणातच ‘ख्वाडा’सारख्या बहुचर्चित चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्यानंतर ‘बबन’ चित्रपटातील भूमिकेमुळे चर्चेत आलेल्या भाऊसाहेब शिंदेने ‘रौंदळ’ या आपल्या आगामी मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणा-या गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर पोस्टर रिलीज करून सोशल मीडियाद्वारे ‘रौंदळ’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. (: After ‘Khwada’, ‘Baban’, now Bhausaheb Shinde announces new movie Raundal, will shine in new role)
भाऊ शिंदे फिल्म्स या बॅनरखाली चित्रपटाची निर्मिती
‘रौंदळ’चं मुख्य वैशिष्टय म्हणजे भाऊ शिंदे फिल्म्स या बॅनरखाली बाळासाहेब शिंदे यांच्या साथीने स्वतः भाऊसाहेब या चित्रपटाची निर्मिती करीत आहे. अर्थातच या चित्रपटात भाऊसाहेबच मुख्य भूमिकेत आहे. रिलीज केलेल्या ‘रौंदळ’च्या पोस्टरवर एक रांगडा गडी पहायला मिळतो. पांढ-या रंगाचा चेक्स शर्ट, डाव्या हातात कडं, खांद्यावर गाडीचा टायर काढण्यासाठी वापरली जाणारी रक्तानं माखलेली टॉमी, वाढलेली दाढी आणि चेह-यावर जखम झालेल्या अवस्थेतील भाऊसाहेब पोस्टरवर आहे. यावरून या चित्रपटात धडाकेबाज अॅक्शनही पहायला मिळणार असल्याचे संकेत मिळत आहे. यावरून भाऊसाहेब पुन्हा एकदा काहीशा हटके भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाला असल्याची जाणीव होते. पोस्टर रिलीज केल्यानंतर काहीशा रावडी लूकमधील भाऊसाहेब ‘रौंदळ’मध्ये नेमकं कशाप्रकारचं कॅरेक्टर साकारणार आहे याबाबत उत्सुकता वाढली आहे.
इतर कलाकारांची नावं गुलदस्त्यात
या चित्रपटातील इतर कलाकारांची माहिती सध्या तरी गुलदस्त्यातच ठेवण्यात आली आहे. गजानन पडोळ हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. पदार्पणातच सर्वांचं लक्ष वेधून घेणा-या भाऊसाहेबने कमालीचा अभिनय करत समीक्षकांपासून रसिकांपर्यंत सर्वांची कौतुकाची थाप मिळवली आहे. महाराष्ट्राच्या लाल मातीतील अस्सल नायक साकारत त्याने देश-विदेशांतील सिनेमहोत्सवांमध्येही जाणकारांकडून दाद मिळवली आहे. अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना भाऊसाहेबने स्वतःच्या हिंमतीवर मिळवलेलं हे यश आणि खेडेगाव ते चंदेरी दुनियेपर्यंतचा प्रवास कोणत्याही नवोदित कलाकारासाठी प्रेरणादायी ठरावा असा आहे. मनात आवड असेल तर कोणतंही काम कठीण नसल्याचं सिद्ध करणारा भाऊसाहेब ‘रौंदळ’मध्ये पुन्हा काहीतरी दणकेबाज करणार यात शंका नाही. लवकरच ‘रौंदळ’च्या चित्रीकरणाला प्रारंभ करण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या
Photo : ‘Get ready for पाडवा की …’, प्रियानं उमेशला नेमकं सांगितलं तरी काय?