मुंबई : टीव्ही मालिकांच्या जगतात सध्या ‘अग्गबाई सासूबाई’ (Aggabai Sasubai Marathi Serial) मालिकेची चर्चा जोरदार रंगात आहे. कोरोनाच्या शिरकावामुळे 15 सप्टेंबरपासून थांबलेले चित्रीकरण पुन्हा एकदा सुरू झाले आहे. ‘अग्गबाई सासूबाई’ मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या निवेदिता सराफ यांनी कोरोनाची लागण झाली होती. मात्र, यशस्वीपणे कोरोनावर मात करत त्या पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाल्या आहेत. सध्या मालिकेत अभिजीत राजेंना घराबाहेर काढण्यासाठी सोहम अर्थात ‘बबड्या’ नव्या शकला लढवत आहे. (Aggabai Sasubai Marathi Serial Update)
बबड्याने सांगितल्याने, अभिजीत राजेंनी आसावरीला न सांगता घरातून काढता पाय घेतला होता. आसावरीच्या अनेक प्रयत्नांनंतरही, त्यांनी खोटी कारणे देत घरी परतण्यास नकार दिला होता. त्यातच ते आजारी पडल्याने आसावरी त्यांची भेट घेण्यासाठी ‘अभिज् किचन’मध्ये गेली होती. त्यानंतर मात्र, तिने थेट शुभ्रावर या सगळ्याचे खापर फोडण्यास सुरुवात केली होती.
शुभाने मंगळसूत्र घालण्यास नकार दिल्याने चिडलेल्या आसावरीने तिच्याशी नाते तोडून टाकण्याचा निर्णय घेतला होता. तर, दुसरीकडे कोणीतरी आसावरी निराधार असल्याचे सांगत, कोणीतरी त्यांच्या घरी आश्रमातील महिलेला पाठवले होते. त्याचवेळी घरात शुभ्राच्या आई-बाबांची एंट्री झाली आहे. घरातील बिघडलेल्या परिस्थितीचा अंदाज आल्याने शुभ्राचे आई-वडील तिच्या घरी येतात. त्यावेळी राजेंबद्दल चौकशी केली असता, आसावरी त्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन टाळते. मात्र, नेमक्या त्याचवेळी आलेल्या आश्रमातील महिलेमुळे ही गोष्ट बाहेर पडणार तितक्यात अभिजीत राजेंनी घरात धडाकेबाज एंट्री घेतली आहे. (Aggabai Sasubai Marathi Serial Update)
खोटा-खोटा रुसवा आणि खरंखुरं प्रेम.
अग्गंबाई सासूबाई दररोज रात्री ८.३० वा. #ManoranjanachaAdhikmaas #AggbaiSasubai #ZeeMarathi pic.twitter.com/LxSNvehgre— Zee Marathi (@zeemarathi) October 11, 2020
सगळ्या प्रकारादरम्यान शुभ्राने त्यांना इथल्या परिस्थितीची कल्पना देऊन घरी बोलावून घेतले, असे अभिजीत राजे आसावरीला सांगतात. हे समजल्यावर सगळे राग-रुसवे विसरून आसावरी शुभ्राला माफ करते. शुभ्राचे आई-वडील घरी जायला निघाल्यानंतर सोहम अभिजीत राजेंना घरातून निघून जाण्यास सांगतो. गाडीची चावी सापडत नसल्याने, तो अभिजीत राजेंसाठी थेट कॅब बुक करतो. मात्र, शुभ्राला याची कल्पना आल्याने, ती मुद्दाम आईकडे थांबण्याचा हट्ट करते. अभिजीत राजे घराबाहेर पडत असतानाच शुभ्रा आणि तिची आई परत आल्याने बबड्याच्या सगळ्या प्लॅनिंगवर पाणी फिरले आहे.
मंगळसूत्र पुन्हा गळ्यात घालण्यासाठी शुभ्रा तयार होईल का? #AggbaiSasubai #ZeeMarathi pic.twitter.com/xlEcLBxja5
— Zee Marathi (@zeemarathi) October 10, 2020
आता शुभ्राने सोहमचे सगळे डाव लक्षात घेऊन पुढे जाण्याचा निश्चय केला आहे. काहीही झाले तरी आपल्या सासूबाईंना पुन्हा एकदा खुश करण्यासाठी सून शुभ्रा बबड्याशी पंगा घेणार आहे. ‘अग्गबाई सासूबाई’ ही मालिका सध्या ट्रेंडिंगमध्ये असून, मालिकेत पुढे काय घडणार याकडे सगळ्या प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. यातील सोहम अर्थात ‘बबड्या’ हे पात्र प्रचंड गाजले आहे. (Aggabai Sasubai Marathi Serial Update)