घर,संसार म्हटलं की महत्त्वाचं असतं बचत करणं. मग ते सामान्य नागरिक असो किंवा सेलिब्रिटी. सर्वांनाच आपल्या घरासाठी, संसारासाठी काटकसर किंला पैशांची बचत ही करावीच लागते. पण काही वेळेला कितीही बचत करायची म्हटलं तरी ते जमत नाही. त्यासाठीच एका अभिनेत्रीने एक महत्वाचा पर्याय सांगितला आहे.
पैशांची बचत करण्यासाठी ऐश्वर्या नारकर काय करायच्या?
ही अभिनेत्री आहे ऐश्वर्या नारकर. ऐश्वर्या या मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. ऐश्वर्या आणि अविनाश नारकर ही जोडीही अनेकांची फेव्हरेट जोडी आहे. ही जोडी गेली अनेक वर्ष मनोरंजन विश्वात काम करत आहेत.
दरम्यान या जोडीने लग्न केलं होतं तेव्हा सेलिब्रिटी असले तरी सर्वसामान्यांसारखा त्यांचाही संसार होता, घर घेण्याची इच्छा होती. त्यावेळी ते काम करत असलेल्या प्रोजेक्टसमधून म्हणावे तेवढे पैसे मिळत नव्हते. मग अशावेळी त्यांनी नेमकं काय केलं, कोणते पर्याय निवडले याबद्दल स्वत: ऐश्वर्या यांनी सांगितलं आहे.
संसारात पैशांचं महत्व आणि पैसे वाचवण्याचा उपाय ऐश्वर्या नारकर यांनी एका मुलाखतीत सांगितला. दरम्यान त्यावेळची परिस्थिती आणि त्यांना त्यातून कसा मार्ग काढला तेही सांगितलं.
“लाइफस्टाइल मर्यादित असल्याने खूप पैसा वाचला”
त्या म्हणाल्या ” मी हिंदीमध्ये जेव्हा काम करायला लागले होते तसेच थोडी वर्ष गेल्यानंतर मराठीतलं माझं बजेट वाढलं. त्यामुळे छान पैसा यायला लागला आणि मग तो कम्फर्ट झोन आला. पण आमची लाइफस्टाइल मात्र तीच मर्यादित असल्याने खूप पैसा वाचायला लागला. आमचं सेव्हिंग खूप व्हायला लागलं. मग आम्ही आमची पहिली फिल्म प्रोड्यूस केली (चॅम्पियन). ती फिल्म चालली, नाही चालली, त्याच्यातून पैसा आला, नाही आला असं आम्हाला विचारणारं कोणी नव्हतं. आमचेच पैसे टाकून आम्ही ती फिल्म केली त्यामुळे एक छान प्रोजेक्ट केलं याचं समाधान होतं. हीच सवय पुढेही डेव्हलप होत गेली.”
“अंथरुण पाहून पाय पसरावेत”
नंतर त्यांनी पैसे वाचवण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे याचे देखील उपाय सांगितले. त्या म्हणाल्या “अंथरुण पाहून पाय पसरावेत हे आपल्याला मध्यमवर्गीय घरात शिकवलं जातं. तर ते कुठेतरी आत भिनलंच होतं.
मला वाटतं तोच सेफ प्लान असू शकतो आपला की, जेवढं आहे त्याच्याहून थोडंसं कमी खर्च करु. आणि छान राहू.” अशाप्रकारे ऐश्वर्या नारकर यांनी पैसे बचतीचा सोपा अन् महत्वाचा उपाय सांगितलाय. ऐश्वर्या यांनी सांगितलेले उपाय सर्वांनी नक्कीच फॉलो करावे असेच आहे.