साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा बहुचर्चित पुष्पा 2 चित्रपट प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफीसवर एकच धुमाकूळ माजवला आहे. चाहत्यांना हा चित्रपट पहायची खूप उत्सुकता असून अनेकांनी अडव्हान्स बूकिंगही केलंय. मात्र या चित्रपटाबद्दल सतत विवाद होत असून अद्यापही ते कायम आहेत. चित्रपटाच्या स्क्रिनींगदरम्यान हैदराबादमधील एका थिएटरमध्ये चेंगराचेंगरी होऊन एका महिलेचा मृत्यू झाला आणि एक मुलगा जखमी झाला. ही घटना ताजी असतानाच आता मुंबईत चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान असे काही घडले, ज्यानंतर शो 20 मिनिटांसाठी थांबवावा लागला. असं नेमकं घडलं तरी काय ?
पुष्पा 2 चं स्क्रीनिंग थांबवलं
मुंबईतील गेटी गॅलेक्सी थिएटरमध्ये पुष्पा 2 चित्रपटाचं स्क्रीनिंग सुरू होतं. मात्र इंटरव्हलदर्यमान एका अज्ञात व्यक्तीने सिनेमा हॉलमध्ये पेपर फवारल्याचा लोकांचा दावा आहे. यानंतर तेथे उपस्थित लोकांना खोकला, घशाचा संसर्ग आणि उलट्या होऊ लागल्या. या घटनेची माहिती मिळताच शो तत्काळ थांबवण्यात आला. सुमारे 20 मिनिटे चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या घटनेचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे ज्यामध्ये थिएटरमधील प्रेक्षक हैराण आणि अस्वस्थ झाल्याचे दिसत होते. तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने सिनेमा हॉलचे आतील दृश्यही दाखवलं.
अल्लू अर्जुनविरोधात केस
याआधी पुष्पा 2 चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या दिवशी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये चेंगराचेंगरी झाली होती. अल्लू अर्जुनला स्क्रिनिंगमध्ये पाहून लोक वेडे झाले. आपल्या आवडत्या अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी लोकांमध्ये धावपळ सुरू झाली आणि तेथील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. मात्र त्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला. तिचा 9 वर्षांचा मुलगा बेशुद्धावस्थेत आढळला. मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी अल्लू अर्जुन आणि संध्या थिएटरच्या व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणावर अभिनेता अल्लू अर्जुनने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुष्पा 2 हा ( दुसरा भाग) प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. त्याला जनतेकडून आणि समीक्षकांकडून दाद मिळत आहे. अल्लू अर्जुन व्यतिरिक्त या चित्रपटात रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचे ओपनिंग डे बॉक्स ऑफिस कलेक्शन अतिशय दमदार आहे. रिपोर्ट्सनुसार, ल्लू अर्जुनच्या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 160 कोटींची कमाई केली आहे. कमाईची ही मालिका इथेच थांबणार नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.