मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल ही सध्या लाइमलाइटपासून दूर आहे. अनेक दिवसांपासून तिने कुठलाही सिनेमा केलेला नाही. मात्र, बॉलिवूडची ही अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अमिषावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रांची येथील सिनेमा निर्माते अजय कुमार सिंग यांनी अमिषाविरोधात 2 कोटी 50 लाख रुपये परत न केल्याचा आरोप केला आहे. अजय कुमार यांच्या तक्रारीनुसार, अमिषा आणि तिचा बिझनेस पार्टनर कुणालने ‘देसी मॅजिक’ या सिनेमासाठी त्यांच्याकडून पैसे घेतले. मात्र, ते परत केले नाही. अनेकदा विचारल्यानंतर अमिषाने त्यांना तीन कोटी रुपयांचा चेक दिला, जो बाउंस झाला.
अमिषा आणि कुणालने सिनेमासाठी निर्माते अजय कुमार सिंग यांच्याकडून 2 कोटी 50 लाख रुपये घेतले. 2013 ला या सिनेमाचं शुटिंग सुरु झालं. हा सिनेमा 2018 पर्यंत पूर्ण होईल, असं अजय कुमार सिंग यांना सांगण्यात आलं. मात्र, तसं नाही झालं. अमिषाने सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर व्याजासह पैसे परत देईल, असं अजय कुमार सिंग यांना सांगितलं होतं.
हा सिनेमा प्रदर्शित झालाच नाही. त्यानंतर अजय कुमार सिंग यांनी अमिषाकडे पैशांची मागणी केली. तेव्हा अमिषाने त्यांच्या हातात तीन कोटींचा चेक दिला. मात्र, तो चेक बाउंस झाला. अजय कुमार सिंग यांनी अमिषाकडे याबाबत विचारणा केली. तेव्हा तिने पैसे देण्यास नकार दिला. तसेच अमिषाने मोठ्या सेलिब्रिटींसोबतचे फोटो दाखवून अजय कुमार सिंग यांना धमकावलं.
त्यानंतर हा सिनेमा यावर्षी प्रदर्शित होईल, असं त्यांना सांगण्यात आलं. मात्र, अजय कुमार सिंग यांना अमिषावर विश्वास बसला नाही, त्यामुळे त्यांनी अमिषाविरोधात फसवणूक केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली.
यापूर्वीही अमिषावर फसवणुकीचा आरोप करण्यात आला होता. त्यावेळी एका इव्हेंट कंपनीने अमिषावर हा आरोप केला होता. अमिषाने एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पैसे घेतले, मात्र ती त्या कार्यक्रमात सहभागी झाली नाही. त्यामुळे संबंधित इव्हेंट कंपनीने तिच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.