नवी दिल्ली | 26 ऑगस्ट 2023 : बॉलिवूडचे बिग बी अर्थात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि किंग खान शाहरूख (Shah Rukh Khan) हे दोघेही इंडस्ट्रीलीत दिग्गज स्टार आहेत. एकीकडे बॉलिवूडच महानायक अमिताभ हे शहनशाह बनून लोकांच्या हृदयावर राज्य करतात. तर शाहरूखही त्याच्या रोमँटिक अंदाजात तर कधी ॲक्शनद्वारे चाहत्यांना खिळवून ठेवतो. पण जेव्हाही या दोघांची जोडी मोठ्या पडद्यावर एकत्र आली आहे , तेव्हा चाहत्यांनी त्यांच्यावर भरभरून प्रेम केलं आहे. मोहोब्बते, कभी खुशी कभी गम , भूतनाथ , कभी अलविदा न कहना यांसारख्या अनेक चित्रपटात एकत्र स्क्रीन शेअर करणारे अमिताभ अन् शाहरूख हे दोघे पुन्हा तीच जादू दाखवण्यासाठी स्क्रीनवर एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे.
पुन्हा एकत्र दिसणार बिग बी – किंग खान ?
शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन दोघेही इंडस्ट्री आणि चाहत्यांच्या हृदयावर राज्य करतात. कधी पिता-पुत्र, कधी गुरु-शिष्य या भूमिकेतून अनेक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या या जोडीला पडद्यावर पाहण्यासाठी चाहते बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. अलीकडेच त्याच्या टीमने ही माहिती शेअर केली आहे , त्यानुसार शाहरुख आणि अमिताभ बच्चन हे लवकरच एका प्रोजेक्टमध्ये एकत्र दिसणार असल्याचे वृत्त आहे. या संदर्भातील एका पोस्टरची एक झलकही शेअर करण्यात आली आहे.
त्यामध्ये बिग बी आणि शाहरूख हे दोघेही काळ्या कपड्यांमध्ये धावताना दिसत आहे. coming soon.. together after 17 years असेही त्यावर लिहीण्यात आहे. मात्र त्यांचा हा नवा प्रोजेक्ट कोणता, तो एखादा चित्रपट आहे की जाहिरात, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती शेअर करण्यात आलेली नाही.
अमिताभ – शाहरूख यांनी एकत्र दिले अनेक हिट प्रोजेक्ट
बॉलीवूडचे दोन मोठे सुपरस्टार असलेले अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांची जोडी 17 वर्षांनंतर पुन्हा एकदा चित्रपटाच्या पडद्यावर पाहणे, ही चाहत्यांसाठी मोठी मेजवानीच असेल. त्यांनी आत्तापर्यंत मोहोब्बते, कभी खुशी कभी गम , भूतनाथ , कभी अलविदा न कहना यांसारख्या एकाहून एक सरस आणि हिट चित्रपटांत सोबत काम केले आहे.
दरम्यान अमिताभ बच्चन यांच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचे झाले तर ते ‘प्रोजेक्ट-के’मध्ये प्रभास आणि दीपिका पदुकोण दिसणार आहेत. तर शाहरूख खानचा ‘जवान’हा चित्रपट लवकरच मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.