Amitabh Bachchan bought plot in Ayodhya | येत्या 22 जानेवारीला अयोध्येत राममंदिराचा उद्घाटन सोहळा असून देशभरातील अनेक नामवंत नागरिक यासाठी उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचाही समावेश आहे. मात्र त्या सोहळ्यापूर्वीच बिग बी यांनी अयोध्येत घर बनवण्यासाठी कोट्यवधी किमतीच जमीन विकत घेतली आहे. एका वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार,अमिताभ बच्चन यांनी मुंबई स्थित डेव्हलपर ‘द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा (HoABL)’ यांच्या द्वारे अयोध्येत 7 स्टार एन्क्लेव्ह, द शरयू येथे एक प्लॉट विकत घेतला आहे.
14.5 कोटींचा प्लॉट घेतला विकत
राम मंदिर ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळ्यापूर्वी अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत घर बांधण्यासाठी 14.5 कोटी रुपयांचा भूखंड खरेदी केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमिताभ बच्चन यांनी मुंबई स्थित डेव्हलपर द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा यांच्या 7-स्टार एन्क्लेव्ह द सरयूमध्ये एक भूखंड खरेदी केला आहे. हाऊस ऑफ अभिनंदन लोढा आणि अमिताभ बच्चन यांच्यातील व्यवहाराची माहिती असलेल्या लोकांचा हवाला देत, मीडिया रिपोर्ट्सने माहिती दिली आहे की अमिताभ बच्चन हे अंदाजे 10,000 स्क्वेअर फुटांचे घर बांधणार आहेत आणि त्याची किंमत 14.5 कोटी रुपये आहे. 22 जानेवारी रोजी राम मंदिर ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळा होणार आहे, त्याच दिवशी प्रोजेक्ट शरयूचे उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिराचे उद्घाटन करणार आहेत. प्रोजेक्ट शरयू हा 51 एकरात पसरलेला आहे. अमिताभ बच्चन यांचा जन्म अलाहाबाद येथे झाला असून सध्या ते मुंबईत राहतात. मात्र अनेक ठिकाणी त्यांची घर, मालमत्ता आहे.
प्रकल्पापासून १५ मिनिटांच्या अंतरावर राम मंदिर
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या प्रकल्पातील आपल्या गुंतवणुकीबद्दल बोलताना अमिताभ बच्चन म्हणाले की, अयोध्येचं माझ्या हृदयात एक विशेष स्थान आहे. दुसरीकडे, एचओएबीएलचे अध्यक्ष अभिनंदन लोढा म्हणाले की शरयूचे “प्रथम नागरिक” म्हणून आम्ही बच्चन यांचे स्वागत करतो. हा प्रकल्प राम मंदिरापासून 15 मिनिटांच्या अंतरावर आहे. तर आंतरराष्ट्रीय विमानतळापासून 30 मिनिटांच्या अंतरावर आहे. या एन्क्लेव्हमध्ये ब्रुकफील्ड ग्रुपचे लीला पॅलेस, हॉटेल्स आणि रिसॉर्ट्सच्या भागीदारीत एक पंचतारांकित पॅलेस हॉटेल देखील असेल. हा प्रकल्प मार्च 2028 पर्यंत पूर्ण होणार आहे.
रिअल इस्टेटच्या किमती सातत्याने वाढ
2019 पासून अयोध्येत पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे. जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने बाबरी मशीद जागेचे मालकी हक्क हिंदूंना दिले. तेव्हापासून, लखनौ आणि गोरखपूर शहरात आणि त्याच्या बाहेरील भागात जमिनीच्या किमती वाढल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अयोध्येतच रिअल इस्टेटच्या किमती 50 टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत. टाटा समूहाशिवाय इतर मोठे समूहही अयोध्येत गुंतवणूक करत आहेत. त्याअंतर्गत शहरात हॉटेल्सपासून ते इतर सुविधांपर्यंत सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.