मुंबई : बॉलिवूडचे बिग बी अर्थात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा बाईकप्रवास (bike journey) सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. बिग बींनी ट्रॅफिक टाळण्यासाठी आणि सेटवर लवकर पोहोचता यावे यासाठी एका अनोळखी व्यक्तीकडून लिफ्ट मागितली होती. त्यासंदर्भात त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत लिफ्ट देणाऱ्या व्यक्तीचे आभारही मानले होते. मात्र यावेळी त्यांनी ना त्या बाईक चालवणाऱ्या इसमाने हेल्मेट (helmet) घातले होते. यानंतर लोकांनी त्यांना हेल्मेट घालण्याची विनंती केली. तसेच काहींनी बिग बी यांना ट्रोल केले होते. एवढेच नाही तर मुंबई पोलिसांनीही त्यावर प्रतिक्रिया दिली. या सर्व मुद्यावर वाद सुरू असतानाचा आता अमिताभ बच्चन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी फक्त शूटिंग करत तुम्हाला फसवत होतो, असे त्यांनी स्पष्ट केले
हेल्मेट न घालण्यावरून होणाऱ्या टीकेवर अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगवर पोस्ट लिहीत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ‘बॅलार्ड स्टेटने गल्लीत चित्रीकरण करण्याची परवानगी घेतली होती. यासाठी रविवारची परवानगी मागितली होती कारण त्यादिवशी सर्व कार्यालये बंद राहतात आणि सार्वजनिक वाहतूक व रहदारी कमी असते. सुमारे 30-40 मीटर लांबीची एक लेन पोलिसांच्या परवानगीनंतर शूटिंगसाठी बंद करण्यात आली आहे. मी जे कपडे घातले आहेत तो चित्रपटातील पोशाख आहत. आणि क्रू मेंबरच्या बाईकवर बसून मी तुम्हाला फसवत आहे. मी कुठेही जात नाहीये. फक्त वेळ वाचवण्यासाठी मी प्रवास करत आहे असे दाखवले आहे.’ अशा शब्दात अमिताभ बच्चन यांनी संपूर्ण किस्सा सांगितला.
बिग बींनी पोस्ट केलेल्या त्या फोटोवर चाहत्यांकडून विविध प्रतिक्रिया आल्या होत्या. यावर अनेकांनी त्यांना हेल्मेट घालण्याचा सल्ला दिला होता. सेलिब्रिटी आहेत म्हणून त्यांच्यावर कारवाई करणार नाही का, असाही सवाल नेटकऱ्यांनी मुंबई पोलिसांना केला होता.
ट्राफिकच्या नियमांचे पालन करणार
अमिताभ बच्चन पुढे म्हणाले, ‘पण हो, जेव्हा मला एखाद्या ठिकाणी वेळेवर पोचायचे असेल आणि वेळ कमी असेल तेव्हा मी हे (बाईकप्रवास) करेन. आणि त्यावेळी हेल्मेटही घालेन. तसेच वाहतूक मार्गदर्शक तत्त्वांच्या सर्व नियमांचे पालन करीन. हे करणारा मी एकटाच नाही. शूटिंग लोकेशनवर पोहोचण्यासाठी अक्षय कुमारनेही हे केले. त्याने हेल्मेट वगैरे घातले होते आणि तो सुरक्षारक्षकाच्या बाईकवर गेला. त्याला कोणी ओळखले नाही. हे जलद आणि चांगले ठरते.
इतकं प्रेम , चिंता आणि काळजी घेऊन ट्रोल केल्याबद्दल सर्वांचे आभार.’ असेही बिग बी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले
अमिताभ बच्चन यांनी नियम मोडले नाहीत
येथे अमिताभ बच्चन यांनी स्पष्ट केले की त्यांनी कोणताही नियम मोडला नाही. ते म्हणाला, ‘मी वाहतुकीचे नियम मोडले, असा गैरसमज करून चिंता व्यक्त करणाऱ्यांना माफ करा. मी तसे काहीही केले नाही. तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप प्रेम.
अमिताभ बच्चन यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ते दीपिका पदुकोण आणि प्रभाससोबत ‘प्रोजेक्ट के’ चित्रपटात दिसणार आहेत.
अभिनेत्री अनुष्का शर्मानेही नुकताच असा बाईकवरू प्रवास केला होता. तिनेही हेल्मेट न घातल्यामुळे अनेकांनी तिच्या वर टीका केली होती.