Amitabh-Jaya 50th Anniversary : हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज जोडपं अमिताभ बच्चन ( Amitabh Bachchan) आणि जया बच्चन ( Jaya Bachchan) यांच्या लग्नाला आज 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. अमिताभ आणि जया यांच्या लग्नाशी आणि वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक कथा आहेत ज्यातून त्यांच्या प्रेमाचे सौंदर्य दिसून येते. मेगास्टार अमिताभ बच्चन अनेकदा त्याच्या लग्नाबद्दल आणि पत्नी जयाबद्दल न ऐकलेल्या गोष्टी शेअर करताना दिसतात. दोघांच्या वैवाहिक जीवनातील प्रेम आजही कायम आहे.
श्वेता बच्चनने तिच्या आई-वडिलांच्या 50 व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आनंदी आयुष्याचे रहस्य सांगितले आहे. मुलगी श्वेताने अमिताभ आणि जया यांचा जुना फोटो शेअर केला आहे. या ब्लॅक अँड व्हाईट फोटोमध्ये दोघेही स्टार खूपच तरुण दिसत आहेत. साडी नेसलेली जया आपल्या पतीशी बोलताना दिसत आहे. त्याचवेळी भिंतीचा आधार घेऊन टेकून उभे राहिलेले बिग बी त्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकताना दिसत आहेत. या फोटोला श्वेताने एक गोंडस कॅप्शनही दिले आहे.
श्वेताने लिहिले की, ‘ 50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. आता तुम्ही golden झाले आहात.’ दीर्घ (सुखी) लग्नाचे रहस्य विचारले असता आईने ‘प्रेम’ असे उत्तर दिले होते आणि बाबा म्हणाले होते ‘पत्नी ही नेहमीच योग्य असते’… असेही श्वेताने तिच्या कॅप्शनमध्ये म्हटले होते.
3 जून 1973 रोजी बिग बींनी फार कमी लोकांच्या उपस्थितीत जया यांच्याशी लग्न केले आणि त्यांना पत्नी बनवले. बिग बींच्या वडिलांच्या इच्छेमुळे दोघांनी लग्न केले होते.
अनेकवेळा खुद्द अमिताभ यांनीही हा किस्सा सांगितला आहे. त्यांना मित्रांसोबत परदेशात जायचे होते, त्यात जया यांचाही समावेश होता. पण तेव्हा त्यांच्या वडिलांनी, हरिवंश राय यांनी एक अट ठेवली होती की, जयाशी लग्न केल्यानंतरच अमिताभ परदेशात जाऊ शकतात. त्यामुळे अमिताभ यांनी जयासोबत घाईघाईत लग्न केले होते. त्या दिवसापासून आजपर्यंत हे जोडपे एकत्र आहे. दोघांच्याही आयुष्यात अनेक चढ-उतार आले. पण बिग बी आणि जया यांनी कधीच एकमेकांची साथ सोडली नाही.