Amitabh Bachchan : बिग बी यांची एक पोस्ट आणि राजकीय वातावरण तापलं; भाजप-ठाकरे गटात ट्विटर वॉर, नेमकं काय झालं ?

| Updated on: May 03, 2024 | 1:16 PM

अभिनेते अमिताभ बच्चन यांनी 'X' वर एक ट्विट शेअर केलं. मात्र त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून नव्या वादाला सुरूवात झाली आहे. भाजप आणि आदित्य ठाकरे यांच्यात ट्विटर वॉर सुरू झालं असून बिग बींच्या एका ट्विटने सर्वांच लक्ष वेधलं आहे.

Amitabh Bachchan : बिग बी यांची एक पोस्ट आणि राजकीय वातावरण तापलं; भाजप-ठाकरे गटात ट्विटर वॉर, नेमकं काय झालं ?
Follow us on

बिग बी अर्थात अमिताभ बच्चन हे चित्रीकरणामध्ये कितीही व्यस्त असले तरीही ते सोशल मीडियावरही चांगलेच सक्रीय असतात. इन्स्टाग्राम, फेसबूक किंवा X (पूर्वीचं ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून ते चाहत्यांसाठी काही ना काही पोस्ट करत असतात. बिग बी यांचे चाहतेही त्यांच्या पोस्ट्सची आतुरतेने वाट पहात असतात. त्यावर अनेक लाइक्स आणि कॉमेंट्स येतात. नेहमीप्रमाणे अमिताभ यांनी नुकतंच एक ट्विट केलं, पण त्यांच्या या ट्विटमुळे नवा राजकीय वाद रंगताना दिसत असून सर्वांचंच त्याकडे लक्ष वेधलं गेलं आहे.

काय आहे बिग बींचं ते ट्विट ?

अमिताभ बच्चन त्यांच्या प्रोजेक्ट्सबद्दल, त्यांच्या दिवसातील एखाद्या खास घटनेबद्दल पोस्ट लिहून ट्विट करत असतातच. नेहमीप्रमाणे काल (2 मे) दुपारी त्यांनी एक ट्विट केलं पण त्यावरून राजकीय वाद सुरू झाला. अमिताभ बच्चन हे काही कामानिमित्त दक्षिण मुंबईत आले होते, त्यासाठी त्यांनी कोस्टल रोडद्वारे जुहू ते मरीन ड्राईव्ह असा प्रवास 30 मिनिटांत केला. त्याबद्दलची पोस्ट लिहीत अमिताभ यांनी त्यांचा अनुभव शेअर केला. ” वाह ! क्या बात है ! साफ़ सुथरी नयी बढ़िया सड़क, कोई रुकावट नहीं ” असे लिहीत त्यांनी ही पोस्ट शेअर केली.

 

मात्र त्यांच्या या पोस्टला राजकीय वादाचा रंग चढला आहे. खरंतर अमिताभ यांनी ही पोस्ट शेअर केल्यावर भाजप महाराष्ट्रतर्फे त्यांच्या ट्वीटला रिप्लाय करण्यात आला. आज हमारे पास ‘कोस्टल रोड’ है… असं म्हणतं भाजपने अमिताभ बच्चन यांचे आभार मानले. आज हमारे पास ‘कोस्टल रोड’ है… असे त्यांनी म्हटले.

भाजपाने मानले आभार

पंतप्रधान मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मुंबईकरांचा प्रवास वेगवान होतोय असा दावा करण्यात आला. ‘ धन्यवाद अमिताभ बच्चन जी, धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई कोस्टल रोड टनल मधून तुम्ही प्रवास केलात याचा आम्हाला आनंद आहे. देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आणि राज्याचे विकासपुरुष उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यामुळेच मुंबईकरांचा प्रवास वेगवान होतोय. भविष्यातदेखील मुंबईकरांना आणि राज्यातील जनतेला उत्तम दर्जाचे रस्ते आणि पायाभूत सोयीसुविधा मिळणार हीच मोदीजींची गॅरंटी..’ असं म्हणत भाजप महाराष्ट्राने बिग बींचे ट्विट शेअर केले.

 

आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर

पण शिवसेना ठाकरे गटाते नेते आदित्य ठाकरे यांनी मात्र भाजपचा हा दावा खोडून काढला. भाजपच्या ट्विटला प्रत्युत्तर देत आदित्य ठाकरेंनी टीका केली. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी कोस्टल रोडबाबात माहिती दिली. कोस्टल रोडचे श्रेय भाजपने घेणे हे हास्यास्पद असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये नमूद केले.

या ट्विटमध्ये त्यांनी कोस्टल रोडबद्दल माहिती देत कोस्टल रोडच्या निर्मितीपासून ते आतापर्यंतचा घटनाक्रम कथन केला. तसेच उद्धव ठाकरे यांनी कोस्टल रोड प्रोजेक्टची घोषणा आणि अंमलबजावणी केली होती, असे त्यांनी नमूद केले. भाजपचं यात काहीही योगदान नसल्याचं त्यांनी ट्विटमध्ये लिहीले. त्यावेळेसचे फोटोही आदित्य यांनी पोस्ट केले, कोस्टल रोडसाठी काय काय उपाययोजना, याची माहिती पोस्ट केली.

 

फडणवीस काय म्हणाले?

आपल्या कामानिमित्त मरीन ड्राईव्हला जात असताना अमिताभ यांनी सिलिंक ते कोस्टल रोड ते अंडरग्राऊंड टनेल असा प्रवास केला. तो अवघ्या 30 मिनिटात. या विषयीचे ट्विट करत त्यांनी कोस्टल रोडचे कौतुक केले. ‘तर परंपरा, प्रतिष्ठा, अनुशाषन हे या सरकारचे तीन स्तंभ आहेत’ अशी डायलॅागवजा प्रतिक्रीया आपल्या रिट्विट मधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ‘मुंबई बदलतेय,आम्ही मुंबईकरांचा प्रवासाचा वेळ कसा कमी करता येईल यावर काम करत आहोत” असेही फडणवीसांनी सांगितले.

अन् कोस्टलचं काम पूर्ण झालं…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून कोस्टल रोडकडे पाहिलं जात होतं. आधी त्यांनी अटल सेतूचं काम मागच्या मुख्यमंत्रीपदाच्या टर्ममध्ये हाती घेतलं होतं. ते यशस्वी केलं. त्यांचा दुसरा ड्रीम प्रोजेक्ट निकाली काढण्यासाठीच्या हलचाली त्यांनी सुरु केल्या होत्या. एकीकडे फडणवीस निवडणूक प्रचारात गुंतले आहेत. दुसऱ्या बाजूला कोस्टल रोडचे काम प्रगती पथावर आहे.काही दिवसांपूर्वीच मुंबईकरांसाठी वरदान ठरणारा कोस्टल रोडचं काम पूर्ण झालं आहे.

या क्रमात कोस्टल रोड आणि वांद्रे वरळी सी लिंक यशस्वी रित्या जोडण्यात आला आहे. बो आर्क स्ट्रिंग गर्डरद्वारे ही मोहिम फत्ते करण्यात आली होती. त्यामुळे कोस्टल रोडवरची वाहतूक थेट सी लिंकवर नेता आली. मुंबईकरांची ट्राफिकपासून सुटका करण्यासाठीचं हे महत्त्वाचं पाऊल होतं. गर्डर जोडण्यासाठी समुद्रातील उंच आणि कमी भरतीचा वापर करण्यात आला. अत्यंत नियोजनपुर्ण पद्धतीने हे काम करणारण्यात आलं. गर्डरद्वारे हे दोन्ही मार्ग जोडण्याचा भारतातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग झाला आहे.

 

कोस्टल रोड प्रकल्पाचा प्रस्ताव पहिल्यांदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 2013 साली मांडला होता. मात्र, प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली ती 2017-18 साली. तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री पद होतं देवेंद्र फडणवीस यांच्याकडे. शिवसेना युतीमध्ये त्यांच्यासोबत होती. पुढं मात्र चित्र पालटलं. 2019 ला राज्यात मोठा सत्ता प्रयोग झाला. महाविकास आघाडीचं सरकार बनलं. यानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली, परंतु कोरोनाचा तडाखा बसला. कोरोनातून सावरल्यानंतरही प्रकल्पाला म्हणावं त्या वेगानं पुढं ढकलं गेलं नसल्याचा आरोप झाला. यादरम्यान विरोधी बाकावर बसलेल्या भाजपने जोरदार टीका केली होती. अडीच वर्षांनंतर महाविकास आघाडीचं सरकार सत्तेतून खाली खेचण्यात आलं. महायुती सत्तेत आली. आता त्यांच्या काळात हा प्रकल्प पूर्णत्त्वास गेला.