मुंबई | 17 फेब्रुवारी 2024 : देशातील सर्वात मोठे बिझनेस टायकून आणि सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी सध्या खुशीत आहेत. मुकेश आणि नीता अंबानी यांच्या घरात लवकरच शहनाईचे सूर घुमणार आहेत. या जोडप्याचा धाकटा मुलगा, अनंत अंबानी यांच लवकरच राधिका मर्चंट हिच्याशी लग्न होणार आहे. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर काही काळापूर्वी त्यांचा साखरपुडा झाला. ‘अँटालिया’ या निवासस्थानी झालेल्या या सोहळ्यात अनेक दिग्गज, तसेच बॉलिवूड सेलिब्रिटीही उपस्थित होते. आता अनंत आणि राधिका लग्नबंधनात अडकणार असून त्यांची प्री-वेडिंग फंक्शन्सही सुरू झाली आहेत.
अनंत-राधिकाचं लग्न नेमकं कधी होणार, कुठे होणार, लग्नात कोणते सेलिब्रिटी परफॉर्म करणार याबद्दल एकेक माहिती आता हळूहळू समोर येत आहे. त्यांच्या लग्नाची तयारी सध्या जोरात सुरू आहे.
पाहुण्यांना मिळणार खास गिफ्ट
दरम्यान, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला उपस्थित असलेल्या पाहुण्यांना कोणतं गिफ्ट दिलं जाणार असल्याची माहितीही समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, मुकेश अंबानी आपल्या मुलाच्या लग्नात येणाऱ्या पाहुण्यांना खास गिफ्ट देणार आहेत, त्यासाठी खास कारागिरांना ऑर्डर देण्यात आली आहे. जाणून घेऊया काय असेल ती खास भेट?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नात पाहुण्यांना खास मेणबत्ती भेट दिली जाणार आहे. या मेणबत्त्या महाबळेश्वरचे दृष्टिहीन कारागीर स्वत:च्या हाताने बनवणार आहेत. ईशा अंबानीच्या स्वदेशने या भेटवस्तू तयार करण्यासाठी अपंग कारागिरांसोबत कोलॅबोरेट केले आहे. जुन्या कारागिरीचा वारसा टिकवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
अनेक सेलिब्रिटी करणार परफॉर्म
काही दिवसांपूर्वी अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंग फंक्शनचे कार्ड सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानुसार या प्री वेडिंग फंक्शन्स 1 ते 3 मार्चपर्यंत चालणार आहेत. तसेच अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये अनेक सेलिब्रिटी आपला दमदार परफॉर्मन्स देणार आहे. त्यात रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि अरिजित सिंगसह अनेक स्टार्सच्या नावांचा समावेश आहे.
कधी आहे लग्न ?
अनंत आणि राधिकाचे प्री वेडिंग फंक्शन्स मुकेश अंबानी यांच्या मूळ गावी जामनगर, (गुजरात) येथे आयोजित केले जातील. अनंत राधिका या वर्षी जुलैमध्ये एकमेकांसोबत सप्तपदी घेतील आणि विवाहबंधनात अडकतील असं समजतं. अजून तरी या जोडप्याच्या लग्नाच्या तारखेची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.