नवी दिल्लीः प्रसिद्ध अभिनेता आणि टीव्ही होस्ट अन्नू कपूर यांना छातीत दुखू लागल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. अन्नू कपूर यांना सध्या दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर गंगाराम हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. अजय गर्ग यांनी सांगितले की, अनू कपूर यांना छातीत दुखू लागल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले आहे. कार्डिओलॉजीचे डॉ. सुशांत वट्टई त्यांच्यावर उपचार करत असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
अभिनेता अन्नू कपूरचे मॅनेजर सचिन यांनी सांगितले की, अन्नू कपूर यांना छातीत दुखत होते. त्यामुळेच त्यांना डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.
26 जानेवारी गुरुवारी सकाळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू केल्यानंतर आता अन्नू कपूर बोलत आहेत आणि त्यांनी जेवणही केले असल्याचे रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले.
अन्नू कपूर यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगण्यात आले होते, मात्रह त्यांच्या मॅनेजरनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. छातीत जळजळ होत असून लवकरच त्यांना घरी सोडणार असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले आहे.
अन्नू कपूर म्हणजे एक अभिनेता असण्यासोबतच ते अप्रतिम होस्टदेखील आहेत. चित्रपट आणि चित्रपटसृष्टीबद्दलची त्यांची चर्चा सर्वांनाच आकर्षित करणारी असते.
अन्नू कपूर हा प्रतिभावान अभिनेता एक उत्तम गायकही आहे. सिंगिंग रिअॅलिटी शो होस्ट करण्यासोबतच त्याने आपल्या गायनाचे अनेक कार्यक्रमही सादर केले आहेत.
अन्नू कपूर हे एक यशस्वी दिग्दर्शक तर आहेतच त्याच बरोबर त्यांनी रेडिओ जॉकीची जबाबदारीही पार पाडली आहे. अन्नू कपूरने 100 हून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले असून त्यांना राष्ट्रीय पुरस्कारांपासून ते फिल्मफेअर पुरस्कारापर्यंत त्यांना त्यांच्या कारकिर्दीत अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.