मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूतचे वडिल केके सिंह यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. केके सिंह हे हृदयविकारानं त्रस्त असल्याचं कळतंय. त्यामुळे त्यांना हरियाणाच्या फरीदाबाद येथील आशियाई रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता त्यांची प्रकृती चांगली आहे. सुशांतच्या वडिलांचा एक फोटो सोशल मीडियाद्वारे समोर आला आहे. या फोटोमध्ये ते रुग्णालयात दिसत आहेत.
सोबतच या फोटोमध्ये सुशांतच्या बहिणी प्रियंका आणि मीतूसुद्धा आहेत. हा फोटो सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हायरल भयानी यानं त्याच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा फोटो समोर येताच सुशांतच्या चाहत्यांकडून केके सिंह यांची प्रकृती लवकर ठिक होण्यासाठी प्रार्थना करण्यात येत आहे.
व्हायरल भयानीनं शेअर केला फोटो
‘सुशांतसिंह राजपूतचे वडिल केके सिंह हे हृदयविकारानं त्रस्त असल्यानं त्यांना फरीदाबाद येथील आशियाई रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या उत्तन आरोग्यासाठी प्रार्थना करा. ‘ असं कॅप्शन देत व्हायरल भयानीनं हा फोटो शेअर केला आहे.
सुशांतच्या कुटुंबात त्याचे वडिल केके सिंह, बहिण प्रियंका, मीतू, श्वेता आणि नीतू हे आहेत. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचं संपूर्ण कुटुंब दुख:त आहे. सुशांतनं वांद्र्याच्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली होती. वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी त्यानं नैराश्यातून हे टोकाचं पाऊल उचललं होतं.
सुशांतनं केली आत्महत्या
सुशांतचा मृतदेह सापडल्यानंतर मुंबई पोलिसांनी सुशांतनं आत्महत्या केल्याचं सांगितलं. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयच्या ताब्यात देण्यात आला. सीबीआयला आतापर्यंत या खटल्याबाबत कोणताही मोठा खुलासा करता आलेला नाही. या खटल्याच्या चौकशीसाठी आतापर्यंत एक कोटी रुपये खर्च झाल्याचं सांगण्यात येत आहे, परंतु सुशांतच्या मृत्यूच्या चौकशीचा कोणताही निकाल अद्याप मिळालेला नाही. या तपासादरम्यान बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरण उघडकीस आलं आहे.