मुंबई : बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेलं कपल म्हणजेच अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर हे दोघं लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांच्या अफेअरची चर्चा होती. अनेकदा हे दोघे सोबत वेळ घालवतानाही दिसून आले. सूत्रांच्या माहितीनुसार, पुढील महिन्यात म्हणजेच एप्रिलमध्ये हे दोघे लग्नबेडीत अडकू शकतात.
अभिनेता अरबाज खान याच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर, काहीच दिवसांत मलायकाचं नाव अर्जुनशी जोडण्यात आलं. हे दोघे अनेकदा सोबत वेळ घालवताना, पार्टीला सोबत जाताना दिसून येत होते. मात्र, या दोघांनीही कधीही ऑफिशिअली आपल्या नात्याला स्वीकारलं नाही. मात्र, आता हे दोघे येत्या 19 एप्रिलला विवाहबंधनात अडकणार असल्याचं समोर आलं आहे. या विवाह सोहळ्याला या दोघांचे कुटुंब आणि जवळचे मित्र आमंत्रित असणार आहेत.
या लग्नाला अर्जुनचे जवळचे मित्र रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण, तसेच मलायकाची गर्ल गँग हजर राहणार आहे, असे मलायका अरोराने अनुपमा चोप्राच्या चॅट शोमध्ये सांगितलं होतं. यावेळी मलायकाने अर्जुनसोबतच्या तिच्या नात्याबाबतही उघडपणे सांगितलं. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात समोर जाण्याची दुसरी संधी मिळत असेल तर तुम्ही नशीबवान आहात, अशा शब्दांत मलायकाने तिच्या भावना व्यक्त केल्या होत्या.
मलायका अरोरा ही बॉलिवूडच्या सुंदर आणि बोल्ड अभिनेत्रींपैकी एक आहे. अरबाज खानसोबतच्या तिच्या 18 वर्षांच्या लग्नातून ती 2017 मध्ये बाहेर पडली. त्यानंतर तिला अनेकांच्या रोषाचा सामनाही करावा लागला. सोशल मीडियावर तिला ट्रोलही करण्यात आले. इतकंच नाही तर घटस्फोट घेण्यापूर्वी अनेकांनी तिला असे न करण्याचा सल्लाही दिला. मात्र, मलायका तिच्या निर्णयावर ठाम होती आणि आता अर्जुन कपूरसोबत ती तिच्या नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहे.