मी आज खूप काही शिकलो… अनुपम खेर यांचे गौरवोद्गार; ‘माय नेम इज जान’मधील अर्पिताच्या अभिनयाचं भरभरून कौतुक

| Updated on: Oct 26, 2024 | 2:49 PM

प्रसिद्ध नृत्यांगना आणि गायिका गौहर जान यांच्या जीवनावर आधारीत 'माई नेम इज जान' या नाटकाचा शो काल मुंबईत पार पडला. हा शो पाहण्यासाठी बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अनुपम खेर आले होते. नाटकाचा शो पाहिल्यानंतर अनुपम खेर यांनी गौहर जानची भूमिका साकारणारी प्रसिद्ध अभिनेत्री अर्पिता चटर्जी यांचं तोंडभरून कौतुक केलं. अर्पिता यांचा अभिनय अत्यंत उत्कृष्ट असाच होता. मी आज खूप काही शिकलो, अशा शब्दात अनुपम खेर यांनी अर्पिता यांच्या अभिनयाला दाद दिली.

मी आज खूप काही शिकलो... अनुपम खेर यांचे गौरवोद्गार; माय नेम इज जानमधील अर्पिताच्या अभिनयाचं भरभरून कौतुक
माय नेम इज जान
Follow us on

मुंबईतील वांद्रे येथील बाल गंधर्व रंगमंदिरात काल ‘माय नेम इज जान’ या नाटकाचा शो आयोजित करण्यात आला होता. प्रसिद्ध गायिका आणि नृत्यांगना गौहर जान यांच्या जीवनावर आधारीत या नाटकात अभिनेत्री अर्पिता चटर्जी यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर, टीव्ही9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरूण दास, अभिनेत्री जुही बब्बर यांच्यासह अनेक मान्यवर हे नाटक पाहण्यासाठी उपस्थित होते. यावेळी प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांनी नाटकाची आणि अर्पिता चटर्जी यांच्या अभिनयाची मुक्तकंठाने स्तुती केली.

हे नाटक पाहून आज मी खूप काही शिकलोय हे मी एक कलाकार म्हणून सांगू शकतो. अर्पिता चटर्जी यांच्यासाठी आजची संध्याकाळ ही अविस्मरणीय होती. त्यांनी अत्यंत ताकदीने गौहर जान यांचं व्यक्तिमत्व साकारलं, अशा शब्दात अनुपम खेर यांनी अर्पिता चटर्जी यांच्या अभिनयाचं कौतुक केलं.

पायी चालत यावं लागतं

यावेळी अनुपम खेर अत्यंत भावूक झाले होते. 1981मध्ये मी पहिल्यांदा माझी शिक्षकाची नोकरी करण्यासाठी इथे आलो होतो. त्या दिवशी मी पायी चालत आलो होतो. आणि आजही वाहतूक कोंडीमुळे मला पायी चालत यावं लागलं. नाट्यगृहात यायचं असेल तर पायी चालत यावं लागतं, अशी कोटी अनुपम खेर यांनी केली.

यावेळी त्यांनी नाटकाच्या सर्व बारकाव्यांवर प्रकाश टाकला. डिझाइन, सादरीकरण, प्रकाश योजना, लाइव्ह आणि बॅकग्राऊंड संगीत एवढेच नव्हे तर स्टेजसाठीचं हे एक परफेक्ट प्रोडक्शन होतं. एकदम व्यावसायिक सादरीकरण होतं. अर्पिताचा अभिनय तर कसदार होता. भावनांची इतकी विविध रेंज मी बऱ्याच काळानंतर पाहिली. एक सहकारी कलाकार म्हणून मला असे वाटते की, अर्पिताकडे आवाज आणि नाटक पोहोचवण्याची अद्भूत क्षमता आहे. तिने जे काही गायलं ते अद्भूत होतं. मला समोरच्या रांगेत बसल्यावर अवघडल्यासारखं झालं. जेव्हा मी एखादा परफॉर्मन्स करत असतो आणि माझ्या ओळखीचं कोणी समोर बसलेलं असेल तर मी त्यांना मागे जाऊन बसायला सांगतो. त्यामुळे तू कोणत्या परिस्थितीतून गेली असेल हे मी समजू शकतो, असं त्यांनी सांगितलं.

डेहराडूनला जायचं होतं, पण धन्यवाद

मला माझी हेअरस्टाईल माहीत आहे. त्यामुळे मी अधिक चमकत आहे (जोरात हसतात) मी इथे आलो याचा मला खूप आनंद आहे. मला आज डेहराडून जायचं होतं. पण तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळालं त्याचा आभारी आहे. तुझ्याबद्दल चांगलं बोलायचं म्हणून बोलत नाहीये, पण हे सत्य आहे, असंही ते म्हणाले.

हे नाटक म्हणजे प्रेक्षकांसाठी पर्वणीच – बरुण दास

नाटकाचे लेखक, टीव्ही 9 नेटवर्कचे सीईओ आणि एमडी बरुण दास यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. अनुपमजी तुम्ही म्हणालात की मला समोर बसल्याने खूपच अवघडल्यासारखे होत होते. पण मी हे सर्व पाहताना मी या सर्व गोष्टीत कुठेतरी बसतो का? असा प्रश्न मला पडला होता. आम्ही बिझनेस करतो. प्रॉफिट लॉस या गोष्टी पाहतो. पण जेव्हा मी कधी अशा कार्यक्रमांना येतो, तेव्हा मला खरंच असे वाटते की आपण समाजातील काही गोष्टीत कमी हातभार लावत आहोत, असं नाटकाचे लेखक, टीव्ही 9 नेटवर्कचे सीईओ आणि एमडी बरुण दास म्हणाले.

मी या नाटकाचा पहिल्या दिवसांपासूनच भाग आहे. मी कित्येकदा दिग्दर्शकाला स्क्रिप्टमधील बदलही सूचवले आहेत. या नाटकात अर्पिता चॅटर्जीचे योगदान खरोखरच उल्लेखनीय आहे. फक्त अर्पिताच नाही, तर या नाटकाच्या दिग्दर्शकापासून ते ब्रॅक ग्राऊंड आर्टिस्ट सर्वांनीच फार मेहनत घेतली आहे. हे नाटक पाहणं हे खरोखरच प्रेक्षकांसाठी पर्वणी असणार आहे, अशा शब्दात बरुण दास यांनी भावना व्यक्त केल्या.

तिचा अभियन थक्क करणारा

अभिनेत्री जुही बब्बर यांनीही अर्पिता हिच्या अभिनयाची स्तुती केली. या नाटकात माझी फार जुनी मैत्रीण अर्पिताने काम केलंय. अनुप ( सोनी)  यांनी खूप वर्षांपूर्वी एक बंगाली सिनेमा केला होता. त्यात अर्पिता ही अनुपची हिरोईन होती. त्यांची मैत्री खूप जुनी आहे. ती मुंबईत आल्यावर तिने मला फोन केला. त्यामुळे मी नाटक पाहायला आले. अर्पिता अत्यंत बुद्धिमान अभिनेत्री आहे. नाटकात ती फार वेगळी दिसत होती. तिचा अभिनय अत्यंत कसदार झाला आहे. आपलं कल्चर आणि आपल्या आर्टिस्टबाबत काही तरी निर्माण करणं वेगळं ही मोठी गोष्ट आहे. ती केली पाहिजे. ही गरज आहे. आपल्याला काही केलं पाहिजे. आपण फक्त वेस्टर्नच्या मागेच धावत असतो, असं जुही बब्बर म्हणाल्या.

अर्पिताने दीड तास अभिनय केला आहे. थक्क करणारा अभिनय तिने केला आहे. कलाकार हा कलाकार असतो. महिला आणि पुरुष असं नसतं. माझाही मनोलॉग आहे. त्यामुळे मला माहीत आहे किती मेहनत करावी लागते. प्रेक्षकांशी किती कनेक्ट व्हावं लागतं हे मी जाणते. त्यामुळे अर्पिता जे करेल ते उत्कृष्टच करेल असं मला वाटतं, असंही जुही म्हणाली.

मला त्यांचे आशीर्वाद मिळाले

अनुपम खेर यांनी अर्पिता यांच्या अभिनयाचं मुक्तकंठाने कौतुक केलं ही अर्पिता यांच्यासाठी आनंदाची गोष्ट होती. अनुपम खेर यांचे उद्गार ऐकून अर्पिता यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. माय नेम इज जान या माझ्या नाटकाच्या प्रीमियरला अनुपम खेर आले. त्यांनी मला आशीर्वाद दिले. त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. अनुपम खेर हे ज्येष्ठ आणि प्रसिद्ध अभिनेते आहेत. त्यांनी माझ्या अभिनयावर विश्वास दाखवला ही माझ्यासाठी खरोखरच मोठी गोष्ट आहे, असं अर्पिता म्हणाली.

 

कलाकारांची हजेरी

केवळ अनुपम खेरच नाही, तर बंगाली सिनेजगतातील दिग्गज रितुपर्णा सेनगुप्ताही हे नाटक पाहायला आल्या. त्यांनीही अर्पिताच्या अभिनयाचं कौतुक केलं. याशिवाय प्रसिद्ध अभिनेत्री जुही चावलानेही अर्पिताच्या अभिनयाची मुक्तकंठाने तारीफ केली.

कसदार अभिनयाचं दर्शन…

25 ऑक्टोबर रोजी मुंबईत माय नेम इज जानचा खेळ पार पडला. या नाटकातून गौहर जान यांची व्यक्तिरेखा, त्यांचा संघर्ष, त्यांचं जगणं आणि तेव्हांचा कालखंड जिवंत करण्यात आला आहे. अर्पिता चटर्जी यांच्या अभिनयाने या गौहर जान यांचा काळ जिवंत झाल्या. एका अद्भूत कलावंताचं जीवन प्रेक्षकांसमोर आलं. गौहर जान या भारतीय शास्त्रीय संगीताला आकार देणाऱ्या पहिल्या महिला गायिका होत्या. ग्रामोफोनवर गाणं रेकॉर्ड झालेल्या त्या पहिल्या भारतीय कलाकार होत्या.

अर्पिता चटर्जी कोण?

या शोची स्टार अर्पिता चटर्जी ही एक कसदार अभिनेत्री आहे. प्रशिक्षित शास्त्रीय नर्तकी आहेत आणि कुशल गायिकाही आहेत. त्यांनी पहिल्यांदा 1997मध्ये भारतात प्रतिष्ठीत ‘सानंदा तिलोत्तमा’ सौंदर्य स्पर्धेत भाग घेऊन ही स्पर्धा जिंकली होती. दोन दशकापासून त्यांचं करिअर सुरू आहे. त्यांनी बंगाली, हिंदी, भोजपुरी आणि ओडिया भाषेतील 50हून अधिक सिनेमांमध्ये काम केलंय. त्यामुळे गौहर जान यांची भूमिका त्या साकारू शकल्या आहेत.

‘माय नेम इज जान’ या नाटकाचं लिखान अबन्ती चक्रवर्ती आणि टीव्ही9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास यांनी केलं आहे. या नाटकाची कोरिओग्राफी रक्तिम गोस्वामी यांनी केली आहे. माय नेम इज जान हे नाटक 1 तास 45 मिनिटाचं आहे. सर्वच भाषिक नाट्य रसिकांसाठी ऐन दिवाळीत मिळालेली ही अनोखी मेजवानी आहे.

‘माय नेम इज जान’चे पुढील शो खालील प्रमाणे

27 ऑक्टोबर 2024 – बालगंधर्व रंगमंदिर, मुंबई

24 नोव्हेंबर 2024 – Stadttheater, Gmunden, Austria

6 डिसेंबर 2024- जीडी बिर्ला सभाघर, कोलकाता

17 आणि 18 जानेवारी 2025 – श्रीराम सेंटर, दिल्ली

24 जानेवारी 2025 – हैदराबाद

8 फेब्रुवारी 2025- कला मंदिर, कोलकाता

23 फेब्रुवारी 2025- जीडी बिर्ला सभाघर, कोलकाता

13 एप्रिल 2025 – द रोझ, ब्रॅम्प्टन, कॅनडा