Nitin Desai | नितीन देसाई स्वप्नांच्या नगरीत विसावले… एनडी स्टुडिओत झाले अंत्यसंस्कार

| Updated on: Aug 04, 2023 | 7:26 PM

बुधवारी सकाळी एन.डी. स्टुडिओ येथे नितीन देसाई यांचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ माजली होती. त्यांच्या शेवटच्या इच्छेनुसार, आज त्यांच्यावर स्टुडिओच्या आवारातच अंत्यसंस्कार करण्यात आले.

Nitin Desai | नितीन देसाई स्वप्नांच्या नगरीत विसावले... एनडी स्टुडिओत झाले अंत्यसंस्कार
Follow us on

कर्जत| 4 ऑगस्ट 2023 : स्वप्नवत वाटावा असा भव्य एन.डी. स्टुडिओ उभारण्यासाठी जीवाचं रान करणारे विख्यात कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (Nitin Desai) अखेर आज या स्टुडिओतच विसावले. ज्या स्टुडिओत त्यांनी असंख्य स्वप्न पाहिली, डोळ्यांच पारणं फिटेल अशी कलाकुसर करत, भव्य सेट उभारले, त्याच स्टुडिओच्या कुशीत त्यांना कुटुंबीय, शेकडो चाहते यांच्या उपस्थितीत अखेरचा निरोप देण्यात आला. नितीन देसाई यांच्या शेवटच्या इच्छेनुसार, स्टुडिओच्या आवारातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार (Nitin Desai Funeral) करण्यात आले.

बुधवार, 2 ऑगस्ट रोजी नितीन देसाई यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने एकच खळबळ माजली. स्वतः उभारलेल्या एनडी स्टुडिओमध्ये नितीन देसाई यांनी वयाच्या ५८ व्या वर्षी स्वतःला संपवलं. त्यांनी मृत्यूपूर्वी लिहीलेल्या चिठ्ठीमध्ये शेवटची इच्छा व्यक्त केली. त्या इच्छेनुसार एन. डी स्टुडिओ येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आर्थिक विवंचनेत अडकल्यामुळे नितीन देसाई यांनी टोकाचं पाऊल उचललं असं सांगण्यात येत आहे. याप्रकरणाची पोलिस सध्या कसून चौकशी करत आहेत.

शुक्रवारी त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे.जे. रुग्णालयात आणण्यात आला होता. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे नेते आशिष शेलार,मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. त्यानंतर त्यांच पार्थिव एनडी स्टुडिओत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.

अभिनेता आमिर खान, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, दिग्दर्शक रवी जाधव, अभिनेता सुबोध भावे, मधुर भांडारकर, मानसी नाईक, अभिजित केळकर असे अनेक कलाकार त्यांच्या अंत्यदर्शनासाठी उपस्थित होते.

वाढदिवसाच्या काही दिवस आधीच संपवलं जीवन

नितीन देसाई यांचा ९ ऑगस्ट रोजी वाढदिवस असतो, मात्र त्याच्या अवघे काही दिवस आधीच त्यांनी त्यांचं आयुष्य संपवलं. त्यांच्या निधनामुळे केवळ सिनेसृष्टीच नव्हे तर राजकारणी, सामान्य नागरिकही हळहळले.

नितीन देसाई यांनी काही वर्षांपूर्वी एडलव्हाईज कंपनीकडून तब्बल १८० कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. त्या कर्जाची पूर्ताता नितीन देसाई करु शकले नव्हते. १८० कोटींचं कर्ज जवळपास २५० कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याची माहिती समोर येत आहे. आर्थिक विवंचनेत अडकल्यामुळे नितीन देसाई यांनी आयुष्य संपवण्याचं हे टोकाचं पाऊल उचललं असं सांगण्यात येत आहे.