मुंबई | 22 जानेवारी 2024 : रामानंद सागर यांचं नाव घेतलं की डोळ्यासमोर येतं ते ‘रामायण’.. न भूतो, न भविष्यती अशी लोकप्रियता मिळालेल्या या मालिकेत प्रभू श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांनी प्रेक्षकांच्या हृदयावर पिढ्यानपिढ्या राज्य केले. अरुण गोविल, दीपिका चिखलिया आणि सुनील लाहिरी या तिघांनी यातील मुख्य भूमिका साकारल्या आणि ते एवढे लोकप्रिय झाले की लोक त्यांना प्रत्यक्ष देवाच्या रुपातच पाहू लागले. पिढया बदलल्या, अनेक वर्ष नव्हे तर दशकं उलटली पण लोकं आजही त्यांना राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या भूमिकेसाठीच ओळखतात. प्रभू रामाचं नाव घेतलं की डोळ्यांसमोर पहिली प्रतिमा येते ती अरुण गोविल यांची. एकेकाळी लोकं या कलाकारांची अक्षरश: पूजा करायचे, त्यांना देवाचं रूपच मानायचे. या मालिकेला आता इतकी वर्ष उलटून गेल्यानंतर ते कलाकार काय करतात हे तुम्हाला ठाऊक आहे का ?
36 वर्षांपूर्वी रामानंद सागर यांच्या रामायणातील राम आणि सीता यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली होती. त्यांच्या व्यक्तिरेखेने लोकांच्या मनावर अशी छाप सोडली की ते खरा माणूस आहेत हेच लोक विसरले. रामायणातील देवाचे रूप पाहिल्यानंतर ही पात्रे लोकांसाठी देव बनली. टीव्हीवरील राम अरुण गोविल यांनी अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे की, ते जिथे-जिथे गेले तिथे लोक त्यांच्या पायांना हात लावण्याचा, नमस्कार करण्याचा प्रयत्न करायचे. हे कलाकार आज कुठे आहेत आणि त्यांच्या अमर भूमिकेनंतर काय करतात ते जाणून घेऊया.
आज 22 जानेवारीला रामानंद सागर यांचे रामायण पुन्हा एकदा तुमचे मनोरंजन करेल. विशेष म्हणजे यावेळी तुम्हाला ते टीव्हीवर नाही तर थिएटरमध्ये पाहता येणार आहे. त्याचवेळी रामायणात राम आणि सीतेनंतर लक्ष्मणाची भूमिका साकारणाऱ्या सुनील लाहिरी यांना आजही लोक लक्ष्मण मानतात. सध्या हे कलाकार अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी गेले आहेत.
अरुण गोविल
रामायण मालिकेत मर्यादा पुरुषोत्तम ‘प्रभू रामाची’ भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल आजही इंडस्ट्रीत सक्रिय आहेत. ते बऱ्याच चित्रपटात काम करत असतात. सध्या अरुण गोविल हे चित्रपट निर्माता आदित्य ओमच्या आगामी हिंदी चित्रपट संत तुकाराममध्ये भगवान विठ्ठलाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात मराठी अभिनेता सुबोध भावे मुख्य भूमिका साकारणार आहे.
दीपिका चिखलिया
तर मालिकेत सीता मातेची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलिया यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्याही इंडस्ट्रीत कार्यरत आहेत. 33 वर्षांनंतर ही अभिनेत्री पुन्हा एकदा टीव्हीवर परतली आहे. धरतीपुत्र नंदिनी या टीव्ही मालिकेमध्ये दीपिका या नुकत्याच दिसल्या होत्या. विशेष म्हणजे या शोची कथा अयोध्येच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे.
सुनील लहरी
प्रभू श्री राम यांची पाठ कधीच न सोडलेल्या लक्ष्मणाची भूमिका मालिकेत सुनील लहरी यांनी साकारली. ते सध्या इंडस्ट्रीत खूप ॲक्टिव्ह नसले तरी ते सोशल मीडियावर बरेचदा दिसतात. रिपोर्ट्सनुसार, ते 2022 मध्ये एका टीव्ही सीरियलमध्ये दिसला होते. कपिल शर्मा शोमध्येही ते आले होते. सुनील लहरी यांनी ‘विक्रम और बेताल’, ‘रामायण’, ‘परम वीर चक्र’, ‘लव कुश’ आणि ‘सपनो की दुनिया’ सारख्या शोमध्ये काम केले आहे.