मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते आशिष विद्यार्थी (Ashish Vidyarthi) हे सध्या त्यांच्या दुसऱ्या लग्नामुळ चर्चेत आहेत. वयाच्या 60व्या वर्षी त्यांनी दुसरं लग्न केलं. कलकत्ता येथे त्यांनी रुपाली बरूआ (Rupali Barua) सोबत रजिस्टर मॅरेज केले आहे. रुपाली या फॅशन इंडस्ट्रीशी संबंधित असून कलकत्ता येथे त्यांचे फॅशन स्टोअरही आहे. आशिष विद्यार्थींचे हे दुसरं लग्न आहे. मात्र त्यांची पहिली पत्नी (first wife and son) आणि मुलगा यांच्याबद्दल लोकांना फारसं माहीत नाही. त्यांच्या कुटुंबियांबद्दल तुम्हाला माहीत आहे का ?
आशिष विद्यार्थी यांचा मुलगा काय करतो ?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आशिष विद्यार्थी यांनी 90 च्या दशकात प्रसिद्ध अभिनेत्री, गायिका आणि थिएटर आर्टिस्ट राजोशी बरूआ यांच्याशी प्रेमविवाह केला. राजोशी या ज्येष्ठ बंगाली अभिनेत्री शकुंतला बरुआ यांच्या कन्या आहेत. आशिष यांच्याप्रमाणेच राजोशी याही चित्रपट आणि मालिकांमध्ये अभिनय करत सक्रिय आहेत. त्यांनी इमली, सुहानी सी एक लडकी यासारख्या अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये अभिनय केला आहे. आशिष आणि त्यांची पहिली पत्नी राजोशी यांना एक मुलगा असून त्याचे नाव अर्थ विद्यार्थी असे आहे. तो २३ वर्षांचा आहे. अर्थ सध्या अमेरिकेत शिकत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अर्थ यालाही आई-वडिलांप्रमाणेच अभिनयात रस असून भविष्यात तो काम करण्यास उत्सुक आहे.
300हून अधिक चित्रपटात आशिष विद्यार्थी यांनी केले काम
गेल्या अनेक दशकांपासून चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचं खणखणीत नाणं वाजवणाऱ्या आशिष विद्यार्थी यांनी ११ भाषांमध्ये 300हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ते AVID मायनर कॉन्व्हर्सेशनचे सह-संस्थापक आणि मोटिव्हेशनल स्पीकरही आहेत. एवढेचं नव्हे तर आजकाल ते युट्यूब चॅनेल, वेबसीरिज आणि ब्लॉगच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत.