दादासाहेब फाळके यांचा ‘भारतरत्न’साठी विचार का केला नाही?
भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक असलेल्या दादासाहेब फाळके यांना भारतरत्न द्या अशी मागणी राष्ट्रवादीचे चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी केली आहे. बॉलिवूडमधल्या सर्व व्यक्तींचा विचार केला जाऊ शकतो मग दादासाहेब फाळके यांचा का नाही? असा सवाल विचारत बाबासाहेब यांनी नाराजीही व्यक्त केली आहे.
1954 ते 2024 पर्यंत देशात 50 जणांना ‘भारतरत्न’ देण्यात आलं आहे. यात चित्रपट आणि संगीत क्षेत्रातील 7 जणांना गौरवण्यात आलं आहे. यात मराठी असलेल्या फक्त “लता मंगेशकर” यांचा समावेश आहे. त्यानतंर प्रभा अत्रे, भीमसेन जोशींना पद्मश्री, पद्मविभूषण पुरस्कारही लाभलेले आहेत. बाकी सर्व पुरस्कार महाराष्ट्रात राहणार्या परंतु मराठी नसलेल्या 216 जणांना पद्म पुरस्कार दिले गेलेले आहेत. महाराष्ट्राच्या नावावर 269 संख्या दिसत असताना त्यात मराठी व्यक्ती केवळ 52चं कशा आहेत? असा सवालही बाबासाहेब पाटील यांनी विचारला आहे.
“महाराष्ट्रात असल्याची खंत वाटते”
तसेच बाबासाहेब पुढे म्हणाले की, ज्यांना पुरस्कार मिळाले त्यांच्या कामाबाबत शंका नाही पण, मराठी लोकांचाही विचार या पुरस्कारासाठी करावा असं स्पष्ट मत बाबासाहेबांनी व्यक्त केलं आहे. “भारतीय चित्रपटसृष्टीला जन्म देणाऱ्या दादासाहेब फाळकेंचा सर्वोच्च पुरस्कारासाठी अद्याप विचारही झालेला नाही, हे पाहून महाराष्ट्रात असल्याची खंत वाटते.” असं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
“अमराठी कलाकारांना पुरस्कारांत झुकते माप दिले जाते”
तसेच त्यांनी बॉलीवूडमधील कलाकार आणि मराठी माणसांमध्ये नेहमी फरत का केला जातो? या मुद्द्यावरूनही प्रश्न उपस्थित करत खंत व्यक्त केली आहे. “बॉलीवूडमधील कलाकारांचा आदर असला तरी केवळ महाराष्ट्र ही कर्मभूमी असलेल्या अमराठी कलाकारांना पुरस्कारांत झुकते माप दिले जाते हा मराठी कलाकारांच्या प्रतिभेचा अनादर आहे” असं म्हणत त्यांन खेद व्यक्त केला.
महाराष्ट्र सोडून इतर राज्य त्यांच्या भाषिक लोकांचा जास्त विचार करतात
पुढे ते म्हणाले की, “तामिळनाडूत तब्बल 147 पद्म पुरस्कार दिले गेले आहेत. त्यात अन्य भाषक कोणीही नाही. कर्नाटकातील 43 जणांना, आंध्र व तेलंगणाच्या 59 जणांना, केरळच्या 51 जणांना पद्म पुरस्कार दिले गेले आहेत. या राज्यांचा आकार पाहता त्यांना मिळालेल्या पुरस्कारांची संख्या अधिक दिसते.
पश्चिम बंगाल व केरळमधील अनुक्रमे 70, 51 पद्म पुरस्कारार्थी आहेत. या राज्यातील कलाकारांचा एकूण सांस्कृतिक पर्यावरणावर असलेल्या वर्चस्वाची साक्ष यातून दिसून येते” असं म्हणत त्यांनी या राज्यांनी त्यांच्या भाषिक लोकांचा विचार सर्वात आधी करून त्यांच्या सन्मान कशा पद्धतीने राखला याबद्दत मत व्यक्त केलं.