मुंबई | 26 जानेवारी 2024 : Bigg Boss 17 चा ग्रँड फिनाले आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. घरातील पाच स्पर्धकांना आत फक्त अजून दोनच दिवस या घरात रहायचं असून, 28 जानेवारीला या शोचा विजेता जाहीर होईल. बिग बॉसचा हा सीझन खूप चर्चेत होता. टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन हे दोघे सोबतच या शोमध्ये आले होते.
विकी जैन आणि पत्नी अंकिता लोखंडे यांचे घरात अनेक वाद झाले, त्यांचं नात तुटतं की काय अशी भीतीही अनेकांना वाटत होती. आता अंकिता लोखंडे फिनालेपर्यंत पोहोचली आहे मात्र शेवटच्या आठवड्यात विकी जैन हा मात्र शोमधून बाहेर पडला आहेय
बिग बॉसच्या घरातून इतक्या दिवसांनी बाहेर पडल्यानंतर विकी जैन सध्या बरीच मजा करत आहे. त्याने बाहेर येताच अनेक स्पर्धकांसोबत पार्टी करण्यास सुरूवात केली आहे. मात्र याच दरम्यान तो पत्नी अंकितालाही विसरलेला नाही. त्याने नुकतंच अंकिताबद्दल एक वक्तव्य केलंय जे चर्चेत आहे.
काय म्हणाला विकी जैन ?
बिग बॉसच्या घरात तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ घालवल्यावर विकी जैन नुकताच बाहेर पडला. शोमध्ये जाताना अंकिता लोखंडे हिचा पती अशी ओळख असलेल्या विकीने घरात गेल्यावर स्वत:ची एक वेगळी छबी निर्माण केली. स्वत:च्या डोक्याने गेम खेळत, कधी भांडत, कधी वादात सापडत त्याने एक वेगळी ओळखही निर्माण केली. मात्र बिग बॉसच्या फिनालेमध्ये जाण्याचं त्याचं स्वप्न काही पूर्ण झालं नाही. शेवटच्या आठवड्यात तो घरातून बाहेर आला. विकीने अलीकडेच पापाराझींशी त्याच्या बिग बॉसच्या प्रवासाबद्दल संवाद साधला. यावेळी त्याने अंकिताबद्दलही वक्तव्य केलं.
विकीला येत्ये अंकिताची आठवण
शोमधून बाहेर आल्यावर विकी त्याच्या घरी परतला. पण त्याला पत्नी, अंकिता लोखंडेची बरीच आठवण येत आहे. तो तिला मिस करतोय. शोमधील प्रवासाविषयी बोलताना विकी म्हणाला – शोमधील माझा प्रवास अप्रतिम होता आणि लोकांना तो आवडला याचा मला आनंद आहे. मी खूप आभारी आहे. मला जे प्रेम आणि समर्थन मिळालं त्यासाठी मी सर्वांचे आभार मानू इच्छितो. मी या कार्यक्रमाचा खूप आनंद घेतला आणि आता मी एकदम रिलॅक्स आहे.
पण त्या घरातून बाहेर आल्यावर मी अंकिताला खूप मिस करतोय. मला तिच्यासोबत राहण्याची खूप सवय झाली आहे. आम्ही इतका वेळ कधीच एकत्र राहिलेलो नाही, लग्नापूर्वीही नाही. मी फक्त तिची वाट बघत आहे. ती (अंकिता) बिग बॉसची ट्रॉफी जिंकून घरी यावी, याचीच मी वाट पाहत आहे, असे विकी म्हणाला.
अंकिताच्या निगेटीव्ह इमेज बद्दल काय म्हणाला विकी ?
यावेळी त अंकिताच्या निगेटीव्ह इमेजबद्दलही बोलला. जेव्हा इतर फायनलिस्टच्या चाहत्यांनी अंकिताला सोशल मीडियावर नकारात्मक पद्धतीने दाखवले, त्याबद्दलही विकीला प्रश्न विचारण्यात आले. तो म्हणाला – बिग बॉस हा एक शो आहे जिथे तुम्ही कोणाचीही इमेज व्हाइटवॉश करू शकत नाही. जे जसं आहे, ते तसंच शोमध्ये दिसतं. लोक खेळताना दबावाखाली येतात आणि त्याच प्रेशरखाली काही चुका करतात. इतका वेळ एकत्र घालवल्यानंतर नाती अधिक घट्ट होतात. तिथून निघून गेल्यावर नाती घट्ट राहतील. अंकिताने ट्रॉफी घरी आणावी अशी माझी इच्छा आहे, असं त्याने नमूद केलं.