मुंबई | 15 फेब्रुवारी 2024 : आपल्या निखळ सौंदर्यासाठी प्रसिद्ध असणारी बॉलिवूड अभिनेत्री मधुबाला. तिच्या जाण्यानंतरही तिच्या सौंदर्याची आजही चर्चा होते. याच मधुबालाने वयाच्या 17 व्या वर्षी बॉलिवूडचा पहिला ॲडल्ट चित्रपटात मुख्य नायिकेची भूमिका केली होती. 19 व्या शतकात ज्यावेळी भारताच्या स्वातंत्र्याची चळवळ सुरू होती. दुसरीकडे हिंदी चित्रपटसृष्टी हळूहळू आपली पाळेमुळे घट्ट करत प्रगती करत होती. त्याच काळात हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
1950 साली दिग्दर्शक KB लाल यांचा ‘हंस्ते आंसू’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. मधुबाला, मोतीलाल, गोप, मनोरमा हे कलाकार त्यात होते. या चित्रपटाच्या कथा आणि शीर्षकावर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला. ‘हसते आंसू’ हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट होता. पण, सेन्सॉर बोर्डाने त्याला दुहेरी अर्थाचे शीर्षक आणि बोल्ड आशयाचे म्हणून प्रौढांसाठी असे प्रमाणपत्र दिले.
सेन्सॉर बोर्डाने ‘हस्ते आंसू’च्या कथेला ‘A’ प्रमाणपत्र दिले. के बी लाल यांचा हा चित्रपट स्त्रीप्रधान होता. त्या काळातील समाजातील पुरुष वर्चस्वाचा आरसा आणि महिलांच्या हक्कांसाठीचा लढा या चित्रपटात दाखविण्यात आला होता. मधुबालाने या चित्रपटात ‘उषा’ ही भूमिका साकारली होती. त्यावेळी तिचे वय अवघे 17 वर्ष इतके होते.
मोतीलाल कुमार हे प्रमुख नायकाच्या भूमिकेत होते. सुशिक्षित उषा हिचा विवाह दारुड्या कुमार सोबत होतो. पत्नी शिक्षित असल्याचा त्याला खूप हेवा वाटत असतो. याचमुळे त्यांच्यात भांडण होत असते. या भांडणाला कंटाळून गरोदर असताना उषा घरातून निघून जाते. उदरनिर्वाहासाठी कारखान्यांमध्ये काम करते. पण, तिथे तिच्यावर पुरुषांची वाईट नजर पडते. पण, उषा हार मानत नाही. अखेर, कुमारला आपली चूक कळते आणि तो पत्नीचा आदर करू लागतो अशी या चित्रपटाची साधारण कथा आहे.
ब्रिटिश राजवटीत 1918 मध्ये भारतीय सिनेमॅटोग्राफ कायदा अस्तित्वात आला. ज्यात सुमारे 31 वर्षांनी 1949 मध्ये स्वतंत्र भारतात सुधारणा केली गेली. सध्या याला सिनेमॅटोग्राफ कायदा 1952 असेही म्हणतात. यासोबतच सेन्सॉर बोर्ड लिमिटेडचीही स्थापना करण्यात आली. चित्रपटांना त्यांच्या आशयानुसार प्रमाणपत्र देणे हे सेन्सॉर बोर्डाचे काम आहे. 1950 च्या दशकात ज्या चित्रपटांना A सर्टिफिकेट म्हणजेच फक्त प्रौढत्वाचे प्रमाणपत्र मिळाले होते अशा चित्रपटांकडे वेगळ्या नजरेने पाहिले जात हाते.