‘गँग्स ऑफ वासेपूर’ सारख्या अनेक हिट चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या अनुराग कश्यपने मोठा निर्णय घेतला आहे. अनुराग कश्यपने बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीला रामराम ठोकला आहे. त्याने बॉलिवूड अतिशय विषारी झाल्याचे म्हणत आता मुंबई देखील सोडणार असल्याचे स्पष्ट केले आहे. अनुरागने इतका मोठा निर्णय का घेतला? नेमकं कारण काय आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
अनुराग कश्यपची एक जुनी मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मुलाखतीमध्ये त्याने दक्षिण भारतात शिफ्ट होण्याचा विचार करत असल्याचे म्हटले होते. आता समोर आलेल्या माहितीनुसार, अनुराग कश्यप हा मुंबई सोडून जात असून बंगळुरूमध्ये शिफ्ट होत आहे. त्याने हिंदी चित्रपट उद्योगाबद्दलची आपली निराशा या आधी अनेकवेळा व्यक्त केली होती आणि बॉलिवूडला देखील विषारी म्हणत आपली स्पष्ट भूमिका पुन्हा मांडली आहे.
मुलाखतीमध्ये अनुराग कश्यप म्हणाला की, ‘मला फिल्म इंडस्ट्रीतील लोकांपासून दूर राहायचे आहे. हा उद्योग दिवसेंदिवस विषारी बनत चालला आहे. येथील प्रत्येकजण हा अवास्तव असणाऱ्या लक्ष्यांच्या मागे लागला आहे. पुढचा चित्रपट ५०० किंवा ८०० कोटींचा कसा बनेल यासाठी प्रयत्न करत आहे. सर्जनशील वातावरण संपुष्टात आले आहे. मला दाक्षिणात्य चित्रपट निर्मात्यांचा नेहमी हेवा वाटतो. इथून निघून बाहेर जाऊन प्रयोग करणे माझ्यासाठी कठीण आहे. मला त्याची किंमत मोजावी लागेल.’
पुढे अनुराग म्हणाला की, ‘माझे मार्जिन कुठे आहे? असे अनेक प्रश्न विचारले जातात. कारण, चित्रपटाच्या अगदी सुरुवातीपासूनच म्हणजे चित्रपट सुरु होण्याआधीच आपण हे कसे विकणार आहोत असा प्रश्न लोकांना पडायला लागला आहे. त्यामुळे चित्रपट निर्मितीचा आनंद हरवळून जातो. याच कारणामुळे मला इथून बाहेर पडायचे आहे. पुढच्या वर्षी मी मुंबई सोडून जाणार आहे.’