मुंबई : बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी नुकतीच वयाची 80 वर्षे पूर्ण केली. ते सध्याच्या घडीला सिनेसृष्टीमध्ये फार अॅक्टिव्ह नसले तरी त्यांची चाहत्यांवरील छाप कमी झालेली नाही. सिनेसृष्टीमध्ये नवनवे अभिनेते पदार्पण करत आहेत, नव्या दमाच्या कलाकारांना तरुणाईकडून उत्स्फूर्त दाद मिळणे अपेक्षित असते. पण हिंदी सिनेसृष्टीमध्ये तरुणाई नवोदित कलाकारांच्या तुलनेत कित्येक पटीने बॉलीवूड बादशाह अमिताभ बच्चन यांच्यावर प्रेम करताना दिसते. त्यामुळेच अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांची संख्या दिवसागणिक वाढतेच आहे. चाहते त्यांच्यावर किती निस्सीम प्रेम करतात त्याची प्रचिती नुकतीच एका प्रसंगातून आली.
एका तरुण चाहत्याने अमिताभ बच्चन यांच्या मुंबईतील जलसा बंगल्याबाहेरील सुरक्षा भेदून आत प्रवेश मिळवला. हा तरुण चाहता कुठला घुसखोर नव्हता, तर अमिताभ बच्चन यांच्यावर निस्सिम प्रेम करणाऱ्या असंख्य चाहत्यापैकी एक होता.
त्याने बंगल्यात प्रवेश केल्यानंतर अमिताभ बच्चन यांची भेट घेतली आणि थेट त्यांचे पाय धरले. त्याचा हा सारा खटाटोप अमिताभ यांची ऑटोग्राफ मिळवण्यासाठीच होता. याचा उलगडा झाल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा मोठा धक्का बसला.
अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याबाहेर नेहमीच चाहत्यांची मोठी गर्दी होत असते. अनेक जण त्यांच्या बंगल्यासोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न करतात. बंगल्याच्या आवारात अमिताभ बच्चन यांना पाहण्याची अनेकांना ओढ असते. मात्र प्रत्येक वेळी ही इच्छा पूर्ण होईल याची शाश्वती नसते.
अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसावेळी मात्र त्यांचे हमखास दर्शन होत असते. चाहत्यांचे हे प्रेम पाहून अमिताभ बच्चन खूपच भावूक होत असतात. नुकताच एका तरुण चाहत्याने त्यांच्या भेटीसाठी दाखवलेली धडपड पाहून अमिताभ प्रचंड भावनिक झाले आणि त्यांनी या क्षणाचा अनुभव आपल्या ब्लॉगवर शेअर केला आहे.
लोक माझ्यावर एवढं प्रेम करतात. माझ्यामध्ये नेमके असे काय खास आहे या कोड्यात मी पडतो, असे अमिताभ यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे. घुसखोरी करणाऱ्या तरुण चाहत्याला सुरक्षारक्षकांनी रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या चाहत्याने माघार घेतली नाही.
इंदूर येथून मुंबईमध्ये आलेल्या तरुणाने बंगल्यामध्ये शिरल्यानंतर थेट अमिताभ बच्चन यांचे पाय धरले. त्यानंतर त्याने त्यांचे रेखाटलेले पेंटिंग्स त्यांना दाखवले आणि त्यांच्याकडून कौतुकाची थाप मिळवण्यासाठी त्यांची ऑटोग्राफ देखील घेतली. याचवेळी वडिलांनी अमिताभ यांना लिहिलेले पत्र त्याने आवर्जून वाचून दाखवले.