मालवणमधील महाराजांचा पुर्णाकृती पुतळा कोसळल्यावर रितेश देशमुख हळहळला, ट्विट करत म्हणाला…

| Updated on: Aug 29, 2024 | 12:46 AM

मालवण येथील राजकोट किल्ल्यावर अवघ्या महाराष्ट्राचं दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. या घटनेनंतर सर्व शिवप्रेमींनी आपला संताप व्यक्त केला आहे, अशातच प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख यांने ट्विट केलं आहे.

मालवणमधील महाराजांचा पुर्णाकृती पुतळा कोसळल्यावर रितेश देशमुख हळहळला, ट्विट करत म्हणाला...
Follow us on

सिंधुदुर्गमधील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा कोसळल्याने राज्यभरातील शिवप्रेमी संताप व्यक्त करत आहेत. मात्र यावरून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असल्याने राजकारणही तापलं आहे. महाराजांचा पुर्णाकृती पुतळा वाऱ्यामुळे कोसळ्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. मात्र या घटनेमुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या  गेल्या आहेत. यावर प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख याने तीन शब्दात आपलं मत मांडलं आहे.

राजे माफ करा…, असं रितेश देशमुख याने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यासोबतच त्याने छत्रपति_शिवाजी_महाराज हा हॅशटॅग वापरला आहे. या पुतळ्याचं अनावरण खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं होतं. पण त्यानंतर अवघ्या आठ महिन्यात हा 34 फुटांचा भव्य पुतळा कोसळला.  अवघ्या महाराष्ट्राचं दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या 8 महिन्यात पडल्याने सर्वांनाच वाईट वाटत आहे. महाराजांच्या पुतळ्यावरून राजकारण होत असल्याने शिवप्रेमी नाराज आहेत. सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने येत आहेत.

राजकोट किल्ल्यावर आज बुधवारी मोठा राडा बघायला मिळाला. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस नेते तथा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांसह महाविकास आघाडीचे नेते आज राजकोट किल्ल्यावर गेले. यावेळी भाजपचे खासदार नारायण राणे आणि माजी खासदार निलेश राणेसुद्धा गडावर गेले होते. यावेळी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि राणे समर्थक यावेळी समोरासमोर आले. जवळपास दोन तासांपेक्षा जास्त वेळ राजकोट किल्ल्यावर तणाव होता. यावेळी नारायण राणे यांनी संतापात एक विधान केलं.

 

ए, कुणी घोषणाबाजी द्यायची नाही. पोलिसांना जेवढं करायचं ते करा. पण यामुळे आमच्या जिल्ह्यात पोलिसांना असहकार्य असेल, त्यांना येवूदेत, तुम्ही त्यांना आमच्या अंगावर घाला. घरात खेचून एकेकाला रात्रभर मारुन टाकेन. सोडणार नाही, असं नारायण राणे म्हणाले होते. या विधानामुळे विरोधक आणखी संतापले असून सरकारवर टीका करत आहेत.