‘पुष्पा 2’ चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटानं आतापर्यंत तब्बल 1000 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. मात्र दुसरीकडे पुष्पा 2 चित्रपटाचा मुख्य अभिनेता असलेल्या अल्लू अर्जुनला पोलिसांनी अटक केली आहे. हैदराबादच्या संध्या थियेटरमध्ये चेंगराचेंगरीची घटना घडली होती. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावणी आणि लगेचच त्याला जामीन देखील मिळाला आहे. मात्र या दुर्घटनेत ज्या महिलेचा मृत्यू झाला, तिच्या पतीने मोठा निर्णय घेतला आहे.
पोलिसांनी अल्लू अर्जुनला अटक केल्यानंतर या महिलेच्या पतीने केस मागे घेण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे. मी माझ्या पत्नीच्या मृत्यूला आणि त्या चित्रपटात झालेल्या चेंगराचेंगरीला अल्लू अर्जुनला जबाबदार मानत नसल्याचं या महिलेच्या पतीनं म्हटलं आहे. रेवती असं या दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे. रेवतीचा पती भास्कर यांनी या घटनेबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं की, माझ्या मुलाला पुष्पा 2 चित्रपट पाहायचा होता, म्हणून मी त्याला चित्रपट गृहात घेऊन गेलो.
तेव्हा तिथे अल्लू अर्जुन आले, मात्र त्यामध्ये त्यांची काहीच चूक नव्हती, मी माझी केस वापस घेण्यास तयार आहे. अल्लू अर्जुन यांच्या अटकेबाबत पोलिसांनी मला कोणतीही माहिती दिली नाही.जेव्हा मी रुग्णालयात पोहोचलो तेव्हा मी माझ्या मोबाईलवर अल्लू अर्जुनच्या अटकेची बातमी पाहिली. अल्लू अर्जुनचा या घटनेशी काहीही संबंध नाही, असं रेवतीच्या पतीनं म्हटलं आहे.
अटकेवर अल्लू अर्जुनचा संताप
दरम्यान दुसरीकडे अल्लू अर्जुनने देखील आपल्या अटकेवर संताप व्यक्त केला. पोलिसांनी मला नाश्ता देखील करू दिला नाही, कपडे देखील घालू दिले नाहीत, ते थेट माझ्या बेडरूमध्ये पोहोचले आणि मला अटक केली असा दावा अल्लू अर्जुने केला आहे. दरम्यान त्याच्या अटकेनंतर त्याला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती, मात्र त्यानंतर लगेचच त्याला आता जमीन देखील मंजूर करण्यात आला आहे.