खय्याम यांच्या सुचनेमुळे आशा भोसले नाराज झाल्या, पण त्याच सुरांनी ‘उमराव जान’ला एका वेगळ्याच उंचीवर नेले!

| Updated on: Aug 19, 2021 | 7:34 AM

दिग्दर्शक मुझफ्फर अली यांचा अत्यंत गाजलेला हा चित्रपट 1981 साली प्रदर्शित झाला. त्यातली संगीतकार खय्याम यांनी संगीतबद्ध केलेली सर्व गीतं गाजली. ‘दिल चीज क्या है’, ‘इन आंखो की मस्ती’, ‘ये क्या जगह ही दोस्तो’ या आशा भोसले यांच्या स्वरातल्या रचना म्हणजे चित्रपट संगीतातला मौल्यवान ऐवज आहे.

खय्याम यांच्या सुचनेमुळे आशा भोसले नाराज झाल्या, पण त्याच सुरांनी ‘उमराव जान’ला एका वेगळ्याच उंचीवर नेले!
रेखा
Follow us on

मुंबई : कवितेचं गीत होणं म्हणजे सृजनाचा अविष्कारच! त्यात संगीतकाराची दृष्टी आणि अनुभव यातून आणखी सौंदर्यात्मक भर पडते. ध्वनिमुद्रणाच्या वेळी कधी वादक, गायक, गायिका, गीतकार यांची मतमतांतरे विचारात घेतली, तरी कधी संगीतकाराचा शब्द अंतिम मानला जातो. गाण्यावर अखेरची मुद्रा उठवणार संगीतकारच असतो. त्याचं योगदान अनेकदा अधोरेखित झालं आहे. तेच स्पष्ट करणारी ही ‘उमरावजान’ चित्रपटातल्या गाण्याची गोष्ट.

दिग्दर्शक मुझफ्फर अली यांचा अत्यंत गाजलेला हा चित्रपट 1981 साली प्रदर्शित झाला. त्यातली संगीतकार खय्याम यांनी संगीतबद्ध केलेली सर्व गीतं गाजली. ‘दिल चीज क्या है’, ‘इन आंखो की मस्ती’, ‘ये क्या जगह ही दोस्तो’ या आशा भोसले यांच्या स्वरातल्या रचना म्हणजे चित्रपट संगीतातला मौल्यवान ऐवज आहे. शहरयार यांच्या रचना संगीतबद्ध करण्याआधी खय्याम यांनी ज्या कादंबरीवरून हा चित्रपट बनवला, ती मिर्झा हदी रुसवा यांची ऐतिहासिक कादंबरी पूर्ण वाचली.

कथासार जाणून घेतला…

नर्तकी उमरावजान शायरा होती, कथ्थक नृत्य शास्त्रीय संगीताचं तिनं शिक्षण घेतलं होतं. हे महत्त्वाचे संदर्भ खय्यामजींनी गीतं संगीतबद्ध करताना लक्षात ठेवले. आशा भोसले यांच्या स्वरातली ही सगळी गीतं विलक्षण शब्दप्रधान आहेत आणि ती शायरीच्या अंदाजानेच पेश होतात.

‘ये क्या जगह है दोस्तो, ये कौनसा दयार है,

हद-ए-निगाह तक, जहा गुबार ही गुबार है’

शहरयार यांचे हे शब्द चित्रपटात उमरावजानची उत्कट व्यथा बनून येतात.

खय्यामजींनी दिला सल्ला

‘उमराव जान’ ही भूमिका रंगवणाऱ्या अभिनेत्री रेखा यांचा आवाज थोडा खोल आणि बसका आहे, हे जाणून खय्यामजींनी आशा भोसले यांना त्यांच्या नेहमीच्या सुरापेक्षा एक सूर खालच्या पट्टीत गायला सांगितलं. आशाजी अस्वस्थ आणि नाराज झाल्या. स्टुडिओत वातावरण थोडं गंभीर झालं. पण, खय्याम शांत होते. अखेर आशाजी खालच्या सुरात गायला तयार झाल्या. गाण्याआधी त्यांनी खय्यामजींकडून वचन घेतलं की, तेच गीत खय्य्याम त्यांच्या नेहमीच्या सुरात परत ध्वनिमुद्रित करतील.

पहिलं ध्वनिमुद्रण झालं. आता परत सूर बदलून गायचं होतं. त्यामुळे वाद्यांचे सूर बदलणे आणि रिहर्सल करणे  यासाठी वेळ हवा होता. या वेळात खय्याम यांनी आशाजींना नुकतंच ध्वनिमुद्रित झालेलं गीत ऐकवलं. आपलाच आवाज ऐकून विस्मय चकित झालेल्या आशाजींनी मग सूर बदललाच नाही. ‘उमरावजान’ची सगळी गीतं आशाजी त्याच सुरात गायल्या.

‘तमाम उम्र का हिसाब मांगती है

जिंदगी ये मेरा दिल कहे तो क्या ये खुद्से शर्मसार है’

हे हृदयाला भिडणारे शब्द त्या स्वरातून चिरंतन झाले. ‘उमरावजान’च्या दहा वर्ष आधी आलेल्या याच विषयांवरच्या ‘पाकिजा’शी चित्रपटाची तुलना होऊ शकली असती. ती तुलना होऊ नये, म्हणून ‘पाकिजा’मध्ये वापरलेलं लोकसंगीत, कथ्थक नृत्याचे पारंपरिक आकृतिबंध यापेक्षा वेगळा विचार खय्यामजींनी केला. शहरयार यांची गीतं प्रगल्भपणे उठून दिसतील, त्यातला आशय अंतर्मुख करेल, अशा चाली खय्याम यांनी योजल्या. या कष्टाचं चीज होऊन ‘उमरावजान’साठी खय्याम यांना राष्ट्रीय पुरस्कार व फिल्मफेअर सन्मान प्राप्त झाला.

हेही वाचा :

तांत्रिक बनून सैफ अली खान आणि अर्जुन कपूर भूतांना पळवणार, पाहा ‘भूत पोलीस’चा ट्रेलर..

जेव्हा हेमा मालिनी ‘धर्मात्मा’च्या चित्रीकरणासाठी अफगाणिस्तानला पोहचल्या होत्या, कशी होती तेव्हाची परिस्थिती? जाणून घ्या…