जन्म 6 जुलै 1985.. हिंदी चित्रपट अभिनेता… चार फिल्मफेअर (Filmfare) अवॉर्ड्स, सर्वाधिक कमाई करणार्या भारतीय अभिनेत्यांपैकी एक… 2012पासून फोर्ब्स इंडियाच्या सेलिब्रिटी 100 यादीमध्ये स्थान… यासह बरंच काही… हा अभिनेता आहे रणवीर सिंग (Ranveer Singh)… 2010पासून खऱ्या अर्थानं बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतलेल्या या अभिनेत्याची गाडी सुसाट आहे ती आजपर्यंत… यशराज फिल्म्सच्या रोमँटिक कॉमेडी बँड बाजा बारात या सिनेमात त्यानं मुख्य भूमिका साकारली. या चित्रपटानं बऱ्यापैकी व्यवसाय केला. यासाठी रणवीर सिंगला सर्वोत्कृष्ट पुरुष पदार्पणासाठी फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. त्यानंतर एक यशस्वी अभिनेता म्हणून नावारूपाला आला. मग लुटेरा काय, राम-लीला काय, त्याच्या अभिनयाचा धमाका सुरूच आहे. असा हा अभिनेता (Actor) आज 36 वर्ष पूर्ण करून 37व्या वर्षात पदार्पण करीत आहे.
रणवीरचा जन्म एका सिंधी हिंदू कुटुंबात अंजू आणि जगजित सिंग भवनानी यांच्या घरात झाला. त्यांचे आजी-आजोबा भारताच्या फाळणीच्या वेळी सध्याच्या पाकिस्तानमधील कराची, सिंध येथून मुंबईत आले. रितिका भवनानी ही त्याची मोठी बहीण. करिअरला सुरुवात करताना त्यानं आपलं भवनानी हे नाव वगळलं. खूप लांबलचक नाव त्यात अक्षरेही खूप असल्याचं तो सांगतो. शिवाय बॉलिवूडमध्ये नावांना विशेष महत्त्व तर आहेच.
इंडियाना युनिव्हर्सिटी ब्लूमिंग्टनमधून बॅचलर पदवी पूर्ण केल्यानंतर रणवीर अभिनयात कारकीर्द करण्यासाठी भारतात परतला. सुरुवातीला जाहिरातीत काम केलं. मग 2010ला ‘बँड बाजा बारात’ घेऊन तो आला. त्यानंतर लुटेरा (2013), संजय लीला भन्साळीची गोलियों की रासलीला राम-लीला (2013), भन्साळींच्याच बाजीराव मस्तानी (2015) आणि पद्मावत (2018) असे चित्रपट त्याने केले. बाजीराव आणि पद्मावतमधली अलाउद्दीन खिलजीची भूमिका तर विशेष गाजली. सिम्बा (2018) या अॅक्शन चित्रपटात त्याने मुख्य भूमिका साकारली, सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांमध्ये स्थान मिळवले. झोया अख्तरच्या गली बॉय (2019)मध्ये महत्त्वाकांक्षी रॅपरच्या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा आणखी एक फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
शिक्षण पूर्ण केल्यानंतर आणि 2007मध्ये मुंबईला परतल्यानंतर रणवीरनं काही वर्षे O&M आणि J. वॉल्टर थॉम्पसन यांसारख्या एजन्सींसोबत कॉपी रायटर म्हणून जाहिरातींमध्ये काम केले. सहायक दिग्दर्शक म्हणूनही काम केलं. परंतु अभिनयासाठी ते सोडून दिलं. त्यानंतर त्यानं आपला पोर्टफोलिओ संचालकांना पाठवण्याचा निर्णय घेतला. तो सर्व प्रकारच्या ऑडिशन्ससाठी जायचा. पण त्याला कोणतीही चांगली संधी मिळाली नाही, फक्त लहान भूमिकांसाठी कॉल येत होते. त्याच्यासाठी हे उदास आणि निराश करणारं होतं. शेवटी 2010ला त्याचं नशीब उजळलं आणि मुख्य भूमिका मिळाली. अनेक टीव्ही शोजमध्येही त्यानं काम केलं आहे.
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी 14 नोव्हेंबर 2018 रोजी विला डेल बाल्बियानेलो, इटली येथे लग्न केले. या दोघांनीही बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा विविध चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. बँड बाजा बारात, लुटेरा, रामलीला, गुंडे, बाजीराव मस्तानी, बेफिक्रे, पद्मावत, सिम्बा, गली बॉय, सूर्यवंशी आणि अलिकडेच आलेला 83 असे काही त्याचे गाजलेले सिनेमे आहेत. अशा या अभिनेत्याचा आज वाढदिवस आहे. त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षावर होताना दिसत आहे. पत्नी दीपिका पदुकोणसह नातेवाई, मित्रमंडळी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चाहत्यांमध्ये उत्साह असून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.