मुंबई : बॉलिवूडमध्ये ‘चिंटू’ या नावाने प्रसिद्ध असलेले अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor) आज आपल्यामध्ये नाहीत, पण त्यांनी आपल्या सुंदर स्मितहास्याने आणि चित्रपटांमधील रोमँटिक पात्रांनी सर्वांना वेड लावले. ऋषी कपूर यांचा जन्म 4 सप्टेंबर 1952 रोजी मुंबईत झाला. ऋषी कपूर चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेता राज कपूर यांचा मुलगा आहे. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईतील कॅम्पियन स्कूलमध्ये झाले. यानंतर त्यांनी मेयो कॉलेज अजमेरमधून पुढील शिक्षण पूर्ण केले. ऋषी कपूर हे चित्रपटाची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील होते. यामुळे त्यांची आवड सुरुवातीपासूनच या क्षेत्राकडे राहिली होती. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांनी चित्रपटांमध्ये अभिनयाला आपले करिअर म्हणून निवडले.
ऋषी कपूर यांनी 1970 मध्ये ‘मेरा नाम जोकर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात त्यांनी राज कपूर यांचे बालपणीचे पात्र साकारले होते. यानंतर, त्यांनी 1973 मध्ये आलेल्या ‘बॉबी’ चित्रपटातून अभिनेता म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटात त्यांच्यासोबत अभिनेत्री डिंपल कपाडिया होती. या चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला.
या चित्रपटानंतर त्यांचा ‘जहरीला इन्सान’ हा चित्रपट आला होता. या चित्रपटात त्यांच्यासोबत अभिनेत्री नीतू सिंग मुख्य भूमिकेत होती, जी नंतर त्याची जीवन साथीदार बनली. शूटिंग दरम्यान, ऋषी अनेकदा नीतूला चिडवायचे, ज्यामुळे ती अनेकदा चिडायची. हळूहळू त्यांच्या भांडणाचे रूपांतर मैत्रीत झाले. चित्रपट फ्लॉप असला तरी, पण या चित्रपटाने ऋषी आणि नीतू यांची मने जुळवली. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि 1980मध्ये लग्न केले. ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांना दोन अपत्य, मुलगा रणवीर कपूर आणि मुलगी रिद्धिमा कपूर साहनी आहेत.
ऋषी कपूर यांनी त्यांच्या बहुतेक चित्रपटांमध्ये रोमँटिक हिरोची भूमिका साकारली आहे, जी प्रेक्षकांना खूप आवडली. पण 2012 मध्ये ‘अग्निपथ’ हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा या चित्रपटातील एका मजबूत खलनायकाच्या भूमिकेत ऋषीच्या अभिनयाने सर्वांना आश्चर्यचकित केले. या चित्रपटात ऋषी कपूर सोबत हृतिक रोशन, संजय दत्त आणि प्रियांका चोप्रा देखील होते. या चित्रपटातील दमदार अभिनयासाठी त्यांना आयफा सर्वोत्कृष्ट नकारात्मक भूमिकेचा पुरस्कार मिळाला.
ऋषी कपूर यांनी बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. ज्यात त्याने अमर अकबर अँथनी, सरगम, नसीब, प्रेम रोग, कुली, चांदनी, हिना, अग्निपथ, कपूर अँड सन्स, मुल्क, द बॉडी इत्यादीमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. अभिनय विश्वात आपली क्षमता सिद्ध केल्यानंतर त्यांनी 1998मध्ये ‘आ अब लौट चलेन’ चित्रपट दिग्दर्शित केला होता. ऋषी यांना 2008 मध्ये फिल्फेअर लाइव्ह टाइम अचिव्हमेंट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
2018 हे वर्ष ऋषी कपूरसाठी अडचणींनी भरलेले होते. वास्तविक या वर्षी ऋषी कपूर यांना कळले की, त्यांना कर्करोग आहे. त्यानंतर ते उपचार करण्यासाठी न्यूयॉर्कला गेले आणि न्यूयॉर्कमध्ये 11 महिने आणि 11 दिवस उपचार घेतल्यानंतर भारतात परतले. असे मानले जात होते की ऋषी कपूर यांनी कर्करोगा विरुद्धची लढाई जिंकली होती. पण या वर्षी फेब्रुवारीमध्ये ‘शर्माजी नमकीन’ या चित्रपट शूटिंग दरम्यान त्यांची तब्येत वारंवार बिघडत होती.
30 एप्रिल रोजी त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना मुंबईच्या सर एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, जिथे त्यांनी 30 एप्रिल 2020 रोजी अखेरचा श्वास घेतला. ऋषी कपूर यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला होता. ऋषी कपूर नेहमीच चित्रपटांमध्ये त्यांच्या उत्कृष्ट अभिनयाद्वारे प्रेक्षकांच्या हृदयात राहतील आणि चित्रपट जगतातील त्यांचे अमूल्य योगदान नेहमीच स्मरणात राहील.
‘या घरात राहण्यासाठी मला तुमच्या परवानगीची गरज नाही!’, अरुंधतीचा संजनाला सज्जड दम!