अभिनेता सलमान खानला धमकी देणाऱ्या आरोपीच्या नांग्या ठेचण्यात मुंबई पोलिसांना मोठं यश आलं आहे. मुंबईच्या वरळी पोलिसांनी वांद्रे परिसरातून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. आजम मोहम्मद मुस्तफा असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. आरोपी आजम मोहम्मद मुस्तफा याने सलमान खानकडे तब्बल 2 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. 2 कोटींची संपत्ती नाही दिली तर जीवे मारणार, अशी धमकी आरोपीने दिली होती. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हादेखील दाखल केला होता. तसेच पोलिसांकडून धमकी देणाऱ्या आरोपीचा शोध घेतला जात होता. यासाठी टेक्निकल आणि विविध माध्यमातून तपास करण्यात आला.
अखेर या प्रकरणात पोलिसांना आरोपीला शोधून काढण्यात यश आलं आहे. आरोपीसोबत आणखी कुणी या कृत्यात सहभागी होतं का? याबाबतची माहिती अद्याप समोर येऊ शकलेली नाही. तसेच आरोपीचा बिश्नोई गँगशी काही कनेक्शन आहे का? याचीदेखील माहिती अद्याप समजू शकलेली नाही. विशेष म्हणजे मुंबई पोलिसांनी नुकतंच काल आमदार झिशान सिद्दीकी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या 20 वर्षीय तरुणाला उत्तर प्रदेशच्या नोएडा येथून अटक केली होती. आरोपीने झिशान सिद्दीकी यांना फोनवर धमकी देताना सलमान खानचा देखील उल्लेख केला होता. पण पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या होत्या. यानंतर आज सलमान खानला धमकी देणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.
आरोपीने वरळी वाहतूक कंट्रोल रुमच्या हेल्पलाईन नंबर 8454999999 यावर 8291489124 या क्रमांकावरून व्हाट्सअप द्वारे धमकीचा मेसेज केलाच. आरोपीने 29 ऑक्टोबरला सकाळी 10.09 वाजता पहिला मेसेज Hello असा केला. तसेच सलमान खान याला देखील बाबा सिद्दीकी यांच्यासारखी गोळी मारली जाईल. झिशान सिद्दीकीला 2 कोटी रुपये द्यायला सांगा. त्यांचा जीव वाचवायचा असेल तर ही गोष्ट मस्करीत घेऊ नका. नाहीतर 31 ऑक्टोबरला तुम्हाला माहिती पडून जाईल. झिशान आणि सलमान खान दोघांना ही वॉर्निंग आहे. आरोपीने 10.14 वाजता पुन्हा मेसेज केला की, ही एक मस्करी नाही. बाबा सिद्दीकीला कसं संपवलं, आता पुढचा निशाणा झिशान, अशी धमकी आरोपीने दिली. आरोपीच्या या धमकीनंतर वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी आरोपीच्या फोन नंबरचे सीडीआर काढले. त्या माहितीच्या आधारे आरोपी राहत असलेल्या ठिकाणी गुप्तपणे पाळत ठेवली. यानंतर पोलिसांनी आरोपीचा सविस्तर माहिती मिळवली. तसेच वांद्रे परिसरातून आरोपीला अटक केली. आरोपीला कोर्टात हरज करण्यात आले. त्यानंतर कोर्टाने आरोपीला उद्यापर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.