अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणाला आता वेगळं वळण येताना दिसत आहे. कारण या प्रकरणातील एका आरोपीने जेलमध्ये स्वत:ला संपवलं आहे. त्याच्या या टोकाच्या कृत्यामुळे खळबळ उडाली आहे. या आरोपीचं नाव अनुज थापन असं होतं. अनुज थापन याच्यावर सलमान खान याच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींना शस्त्र पुरवल्याचा आरोप होता. पोलिसांनी या प्रकरणी जलद गतीने तपास करत गोळीबार करणाऱ्या आरोपींना शोधून काढलं होतं. त्यानंतर अनुज थापन याला अटक करण्यात आली होती. अनुजच्या मृत्यूवर आता त्याच्या वकिलांनी गंभीर आरोप केला आहे. अनुज थापन याचा मृत्यू हा संशयास्पद असल्याचा आरोप त्याच्या वकिलांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाबाबत आता एक नवं गूढ निर्माण झालं आहे.
अनुज थापन याचे वकील अमित मिश्रा आणि वकील विकी शर्मा यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. पोलीसांनी बळाचा वापर केल्याने अनुजचा मृत्यू झाला, असा आरोप वकिलांनी केला आहे. अनुज थापन याचं पोस्टमार्टेम इन कॅमेरा व्हावं अशी तातडीची मागणी वकिलांनी केली. तसेच या प्रकरणाता तपास सीबीआयकडून करण्यात यावा, अशी मागणी अनुजच्या वकिलांनी केला आहे. अनुजचे वकील या प्रकरणी उद्या मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत.
दुसरीकडे अनुज थापन याने स्वत:चं जीवन संपवल्यानंतर आता सुरक्षा यंत्रणाही अलर्ट झाल्या आहेत. अनुजच्या मृत्यूनंतर सीआयडीचं पथक मुंबई पोलीस आयुक्तालयात दाखल झालं आहे. अनुज थापन याच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी आता सीआयडी करणार आहेत. ज्या लॉकअपमध्ये अनुज थापनने स्वत:ला संपवलं, तिथे सीआयडी पथकने पाहणी केल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, मृत अनुज थापनचे पार्थिव जे जे हॉस्पिटलला रवाना करण्यात आलं आहे. याआधी अनुजला जी टी हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं होतं. पण इथे त्याला मृत घोषित करण्यात आलं होतं. यानंतर आता पोलीस बंदोबस्तात अनुज थापन याचं पार्थिव जे जे हॉस्पिटलच्या दिशेला रवाना करण्यात आलं आहे. अनुजच्या पार्थिवावर जे जे हॉस्पिटलमध्ये पोस्टमार्टेम करण्यात येणार आहे. अनुजचा मृत्यू पोलीस कोठडीत झाल्याने इन कॅमेरा पोस्टमार्टेम होणार आहे. विशेष म्हणजे कार्यकारी दंडाधिकारी यांच्या उपस्थितीत पोस्टमार्टेम होणार आहे.