मुंबई : हिंदी चित्रपटसंगीतामधील पाश्चात्त्य संगीत हा चित्रपटसंगीतप्रेमींचा नेहमीच वादप्रतिवादाचा विषय बनला आहे. आपली रागदारी आणि लोकसंगीताची परंपरा बघता पाश्चात्त्य सुरांची उसनवारी कशाला, हा प्रश्न प्रत्येक काळात विचारला गेला. या प्रश्नाचं मूळ उत्तर खरं तर, आपल्या ब्रिटिश गुलामगिरीच्या इतिहासात दडलं आहे. इंग्रजांबरोबर आलेली पाश्चात्त्य सुरांची संस्कृती मुंबई, कोलकाता या महानगरांत काही अंशी रुजली आणि त्याचे पडसाद स्वातंत्र्योत्तर काळातल्या हिंदी चित्रपटसंगीतात लगेच उमटले.
विशेषतः सुरुवातीच्या काळात ऑर्गन, क्लॅरनेट, गिटार, पियानो, अॅकॉर्डियन अशी वाद्यं फार चटकन चित्रपटसंगीतात सामील झाली. 1947 साली संगीतकार सी. रामचंद्र यांनी त्यांच्या ‘शहनाई’ चित्रपटातल ‘आना मेरी जान संडे के संडे’ या गीतात पाश्चात्त्य संगीताचा वापर केला. त्यानंतर 1957मध्ये सी. रामचंद्र यांनी ‘आशा’ चित्रपटात ‘इना मिना डिका’ या गाण्यातून संगीतप्रेमींना आणखी एक नवा अनुभव दिला.
दक्षिणात्य दिग्दर्शक एम. व्ही. रमन यांचा ‘आशा’ हा व्यावसायिक हिंदी चित्रपटाचे एक उत्तम उदाहरण मानता येईल. त्याकाळी दक्षिणेकडे संगीतकार सी. रामचंद्र यांची कमी वेळात उत्तम संगीत देणारे संगीतकार अशी ख्याती होती. या प्रसिद्धीनुसार ‘आशा’ चित्रपट सी. रामचंद्र यांच्याकडे आला. चित्रपटात किशोरकुमार नायकाच्या भूमिकेत आहेत हे लक्षात घेऊन, त्यांना शोभून दिसणारं एखादं उडत्या चालीचं गीत असावं असं ठरलं होतं. याच दशकात अमेरिकेत उदयाला आलेली ‘रॉक अँड रोल’ ही संगीतशैली तेव्हा परदेशात खूप लोकप्रिय होती.
मग, याची कल्पना लक्षात घेऊन, थोडे चटपटीत विनोदी शब्द वापरून या चित्रपटासाठी ‘रॉक अँड रोल’ गाणं करायचं ठरलं. असे धाडसी प्रयोग करण्यात सी. रामचंद्र यांचा हातखंडा होता. या गाण्याचा विचार करत म्युझिक रूममध्ये मंडळी बसलेली असताना बाहेर लहान मुलं खेळत होती. ही मुलं खेळताना ‘इनी मिनी मेनी मो’ असं केजीमधे शिकवलं जाणार बालगीत गात होती. यातून संगीतकाराला गाण्याची पहिली ओळ आणि शब्द सुचले. हे शब्द होते ‘इना मिना डिका.’
पुढे असंच यमक जुळवत शब्द आले ‘डाये डामा निका’. सी. रामचंद्र यांचे साहाय्यक जॉन गोम्स गोवन होते. त्यांनी पुढे शब्द घेतले ‘माका नाका नाका’ मग पुढे ‘चिका पिका रिका रोला रिका रम्पपोश राम्पपोश’ असे अजून निरर्थक पण ‘रॉक अँड रोल’चा तोल सांभाळणारे शब्द वाढवत मुखडा पूर्ण झाला. यथावकाश राजेंद्र कृष्ण यांनी याच मीटरमधे अंतरे लिहिले. किशोरदांनी तर गीत गाताना बहार उडवून दिली. निर्माता-दिग्दर्शकाला गाणं आवडल्यामुळे हे गीत नायिकेवरही चित्रित करायचं ठरलं. आशा भोसले यांनी ते तेवढ्याच समर्थपणे गायलं. हे गाणं सुपरहिट ठरल्यामुळे आणखी एक वेळा या शैलीचा प्रयोग केला. मात्र, ते तितकं प्रसिद्ध झालं नाही.
अवनीला वाचवताना अंजीला ट्रकने उडवलं, शुद्धीवर आल्यावर पती म्हणून तिने दुसऱ्याचं नाव घेतलं!