मुंबई : उत्तम परिपूर्ण निर्मितीचा ध्यास आणि सुयोग्य नियोजन यातून, हिंदी चित्रपटसृष्टीत एकाहून एक सुंदर गीतं जन्माला आली. अर्थपूर्ण शब्द आणि ते प्रवाहित करणारे सुमधुर स्वर आणि सुरेल संगीत कालौघात टिकून राहिलं. परंतु, काही वेळेला कमी वेळात चित्रपट पूर्ण करण्याच्या गडबडीतही काही अद्वितीय गाणी जन्माला आली आणि चिरतारुण्याचं वरदान घेऊन रसिकांना खुणवत राहिली. 1955 साली प्रदर्शित झालेल्या ‘आझाद’ चित्रपटाच्या गीतांबद्दल असंच म्हणता येईल.
‘आझाद’ या चित्रपटामध्ये एकूण नऊ गाणी होती. पण, ज्याला ‘मुख्य गीत’ म्हणता येईल असं गीत म्हणजे लता मंगेशकर आणि चितळकर यांच्या स्वरातलं ‘कितना हसीन है मौसम’ हे प्रेम गीत. या गाण्याचे बोल आणि त्यातील कर्णमधुर संगीत अक्षरशः त्यात रममाण व्हायला भाग पाडतं.
न जाने ये हवाये क्या कहना चाहती है,
छी तेरी सदाये क्या कहना चाहती है
कुछ तो ही आज जिसका हर चीज पर असर है,
साथी है खुबसुरत ये मौसम तुम्हे खबर है’
नव्यानेच प्रेमात पडलेल्या युगुलाला झालेल्या आनंदाच्या क्षणाच्या या लहरी गीताला अक्षरशः वेढून टाकतात.
दक्षिणात्य दिग्दर्शक एस. एम. एस. नायडू यांनी 1954 साली ‘माल्लाईकाल्लन’ या तामिळ चित्रपटातून मोठच यश पाहिलं होतं. हाच चित्रपट त्यांनी एक महिन्यात हिंदीत आणण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी नायडू मुंबईला आले. ‘दीदार’, ‘दाग’, ‘देवदास’ अशा पराभूत नायकांच्या साच्यातून बाहेर पडू इच्छिणाऱ्या दिलीप कुमार यांनी ‘आझाद’मधली मुक्त अभिनयाची वेगळी संधी लगेच स्वीकारली. मीनाकुमारी यांना नायिका म्हणून करारबद्ध केलं.
चित्रपटाचं संगीत देण्यासाठी नायडूंनी नौशाद यांना विचारणा केली. केवळ 15-20 दिवसांच्या अवधीत गाणी बनवण्याचा प्रस्ताव नौशादजीनी नाकारला. ही संधी नायडूंनी सी. रामचंद्र यांच्या पुढे ठेवली. तेव्हा अशा आव्हानांची आवड असणाऱ्या सी. रामचंद्र यांनी हे काम स्वीकारलं. राजेंद्र कृष्ण यांच्याकडून गीतं लिहून घेतली. ‘जारी जारी ओ कारी बदरिया’, ‘राधा न बोले ना बोले’, ‘देखो जी बहार आयी’, ‘कितनी जवा है रात’, अशी बहारदार गीतं पाहता पाहता संगीतबद्ध करून लता यांच्या स्वरात ध्वनिमुद्रीतही केली.
‘कितना हसीन है मौसम’ या चित्रपटातल्या एकमेव युगुल गीतासाठी तलत मेहमूदना बोलवायचं ठरलं. पण ऐनवेळच्या गडबडीत वेळ जुळून येईना. मग हे गीत लताबाईंबरोबर सी. रामचंद्र स्वतः गायले. गाताना चितळकर आणि संगीतकार म्हणून सी. रामचंद्र ही एकाच नावाची विभागणी त्यांनी पहिल्यापासूनच केली होती. त्या काळात दिलीपकुमार पडद्यावर बहुतांशी तलत मेहमूद यांचा आवाज पार्श्वगायनासाठी घेत. तलत यांच्या स्वरातलं हळुवारपणा या गीतात चितळकर यांच्याही गळ्यातून उमटला. हे गीत तलतच्या आवाजात आहे, असा गैरसमज आजही अनेकांचा होतो.