मुंबई : ‘सेक्स सिंबल’ हे बिरुद चिकटलेली दाक्षिणात्य अभिनेत्री सिल्क स्मिता (Silk Smitha) हिचं आयुष्य वादळापेक्षा कमी नव्हतं. तिच्या आयुष्याची अखेरही अशीच वादळी ठरली. कमी वयात झालेलं लग्न आणि त्यानंतर सासरी झालेला छळ यामुळे सिल्क स्मिता पळून गेली. पुढे व्यावसायिक आयुष्यात घवघवीत यश मिळालं, पण वैयक्तिक आयुष्यात स्मिता एकाकी असल्याचं बोललं जातं. 23 सप्टेंबर 1996 रोजी वयाच्या अवघ्या 36 व्या वर्षी तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्या दिवशी मैत्रिणीला फोन करुन तिने घरी बोलावलंही होतं, मात्र मृत्यूपूर्वी आपल्या मनात काय सलतंय, हे न सांगताच तिने एक्झिट घेतली.
तेलुगू, तमिळ, मल्ल्याळम आणि कन्नड या चारही दाक्षिणात्य भाषांसह बॉलिवूडमध्येही सिल्क स्मिताने मोठं नाव कमावलं. 80 च्या दशकात तिने अनेक हिट डान्स नंबर दिले होते. सहाय्यक अभिनेत्री म्हणून तिने इंडस्ट्रीत प्रवेश केला. त्यानंतर 1979 मध्ये वांदीचक्करम या तमिळ चित्रपटात तिने साकारलेली सिल्क ही व्यक्तिरेखा लक्षवेधी ठरली आणि याच नावासह ती सेक्स सिंबल म्हणून ओळखली जाऊ लागली. 1980 च्या कालखंडात इरॉटिक भूमिका करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये ती गणली गेली. 17 वर्षांच्या कारकिर्दीत तिने जवळपास 450 चित्रपटात काम केलं. म्हणजेच वर्षाला पंचवीसहून अधिक.
लग्नानंतर सासर सोडून पळाली
सिल्क स्मिताचं मूळ नाव विजयालक्ष्मी वडलापटला (Vijayalakshmi Vadlapatla). तिचा जन्म 2 डिसेंबर 1960 रोजी एका तेलुगू कुटुंबात झाला. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने चौथीत म्हणजे वयाच्या 10 व्या वर्षी तिला शिक्षण सोडावं लागलं. कमी वयातच तिचं लग्न लावून देण्यात आलं. मात्र सासरी तिला चांगली वागणूक न मिळल्याने ती पळून गेली.
…आणि विजयालक्ष्मीची सिल्क स्मिता झाली
तिने एका अभिनेत्रीची टच-अप आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. त्यानंतर तिला छोट्या-मोठ्या भूमिका मिळत गेल्या. मल्याळी दिग्दर्शक अँथनी ईस्टमन यांनी इनाये थेडी या सिनेमात तिला मुख्य भूमिका दिली. त्यानेच तिला स्मिता हे नाव दिलं. पुढे तिला दिग्दर्शक विनू चक्रवर्तींनी तामिळ सिनेमात भूमिका दिली. तिच्यासाठी हा मोठा ब्रेक ठरला. त्यांच्या पत्नीने स्मिताला इंग्रजी शिकवलं. तिला डान्स शिकवण्याचीही व्यवस्था केली. मात्र तिच्या सेक्स सिंबलमुळे तिने कॅब्रे डान्सर, व्हॅम्प अशा भूमिका स्वीकारल्या. अल्पावधीत सिल्क स्मिता स्टार झाली. प्रेक्षकांनी तिला गौरवलं, मात्र काही समीक्षक, पत्रकारांनी तिला सॉफ्ट पॉर्न अभिनेत्री असं संबोधण्यास सुरुवात केली.
स्मिताचा मित्र परिवार लहानसा होता. ती पटकन मित्र जोडत नसे. स्पष्टवक्तेपणा आणि शीघ्रकोपी स्वभावामुळे ती उद्धट मानली जात होती. प्रत्यक्षात ती वक्तशीर, जबाबदार, महत्त्वाकांक्षी होती. तिचे डोळे हे तिचं सौंदर्यस्थळ मानलं जात.
अखेरच्या दिवशी काय झालं?
23 सप्टेंबर 1996 रोजी तिने आपली मैत्रीण, डान्सर अनुराधाला फोन केला. आपल्या मनात सलणाऱ्या एका विषयावर तिला मन मोकळं करायचं होतं. मुलाला शाळेत सोडून अनुराधा सकाळी उशिरा तिच्या घरी पोहोचली. तेव्हा स्मिता तिला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. शवविच्छेदन अहवालानंतर तिने आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं. त्यावेळी तिच्या शरीरात मोठ्या प्रमाणावर मद्याचे अंश सापडले होते.
आयुष्याचा ‘डर्टी पिक्चर’
2011 मध्ये सिल्क स्मिताच्या आयुष्यावर आधारित डर्टी पिक्चर हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. अभिनेत्री विद्या बालनला या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. या सिनेमाला मोठं यश मिळालं. मात्र हा सिनेमा आपल्या संमतीने बनवला नसल्याची नाराजी स्मिताच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली होती. त्यानंतर निर्माती एकता कपूरने चित्रपट सिल्क स्मिताच्या जीवनावर आधारित नसल्याचा उल्लेख केला.
संबंधित बातम्या :