मुंबई : आज दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनाला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. जरी सुशांत सिंग राजपूत आज आपल्यात नसला तरी चाहते आजही आणि सिनेसृष्टीतील कलाकार त्याला विसरू शकले नाहीयेत. सुशांतने 14 जून 2020 रोजी त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर त्याच्या मृत्यूवरून बराच वाद निर्माण झाला होता.
सुशांतची आज तिसरी डेथ एनिवर्सरी आहे. यानिमित्त त्याचे अनेक मित्र, कुटुंबीय आणि चाहते त्याच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देताना दिसत आहेत. यामध्ये सुशांतची खास मैत्रिण, अभिनेत्री सारा अली खाननं देखील सुशांतच्या पुण्यतिथीनिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या तिची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे.
साराने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर सुशांतसोबतचे दोन फोटो शेअर केले आहेत. हे फोटो केदारनाथ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे आहेत. यातील एका फोटोत सारा आणि सुशांत हेलिकॉप्टरमध्ये बसून मागे वळून हसताना दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोत दोघेजण चित्रपटाची स्क्रिप्ट वाचताना दिसत आहेत.
साराने हे फोटो शेअर करत भावनिक कॅप्शनही लिहिलं आहे. “केदारनाथच्यया आमच्या पहिल्या ट्रिपवर..पहिल्या शूटच्या मार्गावर. मला माहित आहे की मी हे सगळं पुन्हा अनुभवू शकणार नाही. पण मला माहिती आहे की तू ऍक्शन, कट, सनराईज, नदी, ढग, चांदनीरात, केदारनाथ आणि अल्लाच्या मध्ये होतास. तू नेहमी ताऱ्यांमध्ये चमकत राहो”, असं सारानं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. सध्या तिच्या या पोस्टनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.