मुंबई : स्टार प्रवाहवरील ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या मालिकेनं नुकतंच 100 भागांचा टप्पा गाठला आहे. या खास दिवसाचं सेलिब्रेशन अनोख्या पद्धतीनं करण्यात आलंय. कोल्हापूरमधील चेतना अपंगमती विकास संस्थेतील विकलांग मुलांसोबत मालिकेच्या टीमनं 100 भागांच्या पूर्ततेचा आनंद साजरा केला. चेतना अपंगमती विकास संस्था गेली अनेक वर्ष बौद्धिक अक्षम मुलांचं संगोपन करुन त्यांना स्वत:च्या पायावर उभं रहाण्याचे धडे देत आहे. या मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याच्या हेतूनं ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेच्या टीमनं या मुलांसोबत सेलिब्रेशन करण्याचं ठरवलं. या खास प्रसंगी निर्माते महेश कोठारे आणि मालिकेतील प्रमुख कलाकार उपस्थित होते.
कलाकारांना बघून मुलांना आनंद
मालिकेत दिसणाऱ्या कलाकारांना प्रत्यक्ष भेटल्याचा आनंद या मुलांच्या आणि त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावर दिसत होता. ज्योतिबा आणि मालिकेतील सर्व कलाकारांची भेट घेत त्यांनी मालिकेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. मालिकेचा यापुढील प्रवासही तितकाच रोमहर्षक असणार आहे.
विशाल निकमचा फिटनेस फंडा
फिट राहण्यासाठी आणि उत्तम लाईफस्टाईलसाठी तुमचे लाडके कलाकार जीम, वर्कआऊट, योगा आणि डान्स यासारख्या अनेक गोष्टी करत असतात. यात ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेत ज्योतिबा साकारणारा विशाल निकमही मागे नाहीये. ज्योतिबांची भूमिका साकारण्यासाठी विशाल भरपूर मेहनत घेतोय. शूटिंगच्या व्यस्त वेळापत्रकातूनही वेळ काढत विशाल वर्कआऊट करतो. खरंतर शूटिंगमधून जीमसाठी वेगळा वेळ काढणं शक्य होत नाही त्यामुळे विशालनं चक्क सेटवरच वर्कआऊट करणं सुरू केलं आहे.
भूमिकेसाठी शरीर फिट ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे विशालनं हा नवा मार्ग शोधून काढला आहे. सेटवरच्या वस्तूंचा वापर करत त्यानं सेटलाच जीम बनवलं आहे. विशाल शुद्ध शाकाहरी व्यक्ती आहे. त्यामुळे दूध, मोड आलेली कडधान्य, ताज्या भाज्या आणि फळं अश्या सकस आहाराकडे नेहमीच त्याचा कल असतो. सोबत दररोजचा व्यायाम केल्यामुळे विशालला शरीर फिट ठेवणं शक्य झालं आहे.
संबंधित बातम्या
Marathi Movie ‘मन कस्तुरी रे’ चित्रपटाचं शूटिंग पूर्ण, अभिनव बेर्डेनं व्यक्त केल्या भावना
Bigg Boss 14 | सलमान खानने राहुल वैद्य आणि अली गोनीला झापलं!