मुंबईः आपण कोण आहोत, आपली संस्कृती परंपरा काय आहे, ही एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचली पाहिजे. ती टिकली तरच खरं अन्यथा आपण कपाळ करंटे ठरू… ही दिग्दर्शक केदार शिंदे यांची एक पोस्ट काही दिवसांपूर्वी व्हायरल झाली होती. ज्या महाराष्ट्र शाहीर चित्रपटाच्या अनुषंगाने शिंदे यांनी ही पोस्ट लिहिली होती. शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारीत हा चित्रपट लवकरच चित्रपट गृहात प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक केदार शिंदे यांनी चित्रपटाचा एक खास व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओसाठी त्यांनी लिहिलेल्या ओळी चर्चेचा विषय ठरत आहेत…
केदार शिंदे यांनी सोशल मीडियावर महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाचा एक खास व्हिडिओ शेअर केलाय. संपूर्ण स्क्रिनभर भगवा पसरतो, त्यानंतर एक कणखर, रांगडा, दगडी हात येतो.. त्यावर अंकुश चौधरी हा शाहीर साबळे यांच्या भूमिकेत दिसतो.
फडकेल नव्याने भगवा..
महाराष्ट्र पुन्हा गर्जेल..
जनतेचा बुलंद आवाज..
लेखणीतूनी बरसेल..
देऊनी डफावर थाप..
ललकारत होते जाहीर..
अर्पितो तुम्हाला तुमचे..
तुमचाच.. महाराष्ट्र शाहीर..
महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाचं दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केलंय. तर संजय छाब्रिया आणि बेला केदार शिंदे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. अंकुश चौधरी चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे. त्यासह अतुल काळे, सना केदार शिंदे, अमित डोलावत हे कलाकारही मुख्य भूमिकेत आहेत. विशेष म्हणजे अजय-अतुल या जोडगोळीनं चित्रपटातील गाण्याचं संगीत दिग्दर्शन केलं आहे.
येत्या २८ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
गर्जा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा.. हे गाणं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारे लोकशाहीर कृष्णराव साबळे हे शाहीर साबळे म्हणून ओळखले जातात. सातारा जिल्ह्यातील पसरणी गावात साबळे यांचा जन्म झाला. शाहीर शंकरराव निकम यांच्याकडून त्यांनी शाहिरी कलेचे धडे घेतले. स्वातंत्र्य चळवळ, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातून शाहीरांचा डळ कडाडत राहिला. महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमातून ते महाराष्ट्रात अधिक लोकप्रिय झाले.