“ती टेरेसच्या कठड्यावर पाय सोडून बसली होती”; दिव्या भारतीच्या मृत्यूची ‘ती’ रात्र; मैत्रिणीने केले बरेच धक्कादायक खुलासे

| Updated on: Dec 15, 2024 | 1:15 PM

दिव्या भारतीच्या अकाली निधनानंतरच्या अनेक वर्षांनी, अभिनेत्री गुड्डी मारुती यांनी दिव्याच्या आयुष्यातील काही धक्कादायक प्रसंग उलगडले आहेत. दिव्याच्या अपार्टमेंटच्या कठड्यावर बसलेल्या दिव्याचा किस्सा आणि तिच्या मृत्यूच्या आधीच्या रात्रीची पार्टी यासारख्या घटनांबद्दल गुड्डी मारुतीने अनेक खुलासे केले आहेत.

ती टेरेसच्या कठड्यावर पाय सोडून बसली होती; दिव्या भारतीच्या मृत्यूची ती रात्र; मैत्रिणीने केले बरेच धक्कादायक खुलासे
Follow us on

दिव्या भारती आज जगात नसली तरी तिचा चाहता वर्ग अजूनही खूप मोठा आहे. आजही काहीना काही कारणाने तिची आठवण ही निघतेच. फक्त वयाच्या 19 व्या वर्षी दिव्याने आपला जीव गमावला होता. तिच्या चित्रपटासंदर्भात, तिच्या वैयक्तिक आयुष्यासंदर्भात एवढच नाही तर तिच्या निधनासंबंधीसुद्धा अनेक किस्से आजही सांगितले जातात. त्यातच आता एका मुलाखती दरम्यान अभिनेत्री गुड्डी मारुतीने अनेक किस्से सांगितले आहेत.

आजही चाहत्यांच्या मनात आठवण 

दिव्या भारतीच्या सौंदर्य , तिच्या अभिनयापेक्षाही चर्चा होते ते तिच्या निधनाची. त्याबद्दलच्या किस्स्यांबद्दल. कारण तिचा मृत्यू हा आजही एक गुढच मानला जातो. दिव्या भारतीने फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं होतं. तिचे जवळपास सर्वच चित्रपट हीट ठरत होते. पण यादरम्यान 1993 मध्ये अचानक तिने आपला जीव गमावला. आणि तिच्या या मृत्यूने सर्वांनाच आश्चर्य वाटलं होतं.

फक्त 19 व्या वर्षी दिव्या भारतीचं निधन झालं. अभिनेत्रीच्या निधनानंतर तिच्या आयुष्यासंबंधी अनेक धक्कादायक दावे, खुलासे करण्यात आले होते. त्यातच आता अभिनेत्री गुड्डी मारुतीने यावर भाष्य केलं आहे. नुकत्याच एका मुलाखतीत गुड्डी मारुतीने दिव्या भारतीची आठवण काढली. तिने दिव्या फार गोड, सुस्वभावी, दयाळू मुलगी होती असं सांगितलं. दिव्या ही फिल्म इंडस्ट्रीची नव्याने उदयास येणारी स्टार होती असंही तिने म्हटलंय.

दिव्याच्या मृत्यूच्या रात्रीबद्दल मैत्रिणीचा खुलासा

गुड्डीला ती घटना आठवली जेव्हा तिने एका रात्री दिव्याला पाचव्या मजल्यावर तिच्या अपार्टमेंटच्या भिंतीवर बसलेले पाहिले. ती उंचीची कोणतीही भिती नसल्याप्रमाणे बसली होती असं तिने सांगितलं. याशिवाय तिने त्यात अजून एक धक्कादायक आणि भितीदायक प्रसंग सांगितला. ती म्हणाली “दिव्या जुहू येथील एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील अपार्टमेंटमध्ये राहत होती. एका रात्री मी तिच्या बिल्डिंगजवळच्या एका आईस्क्रीमच्या दुकानात जात असताना मला कुठूनतरी माझं नाव ऐकू आलं. मी वर पाहिलं तर दिव्या पाचव्या मजल्यावरच्या टेरेसच्या कठड्यावर पाय खाली सोडून बिनधास्त बसली होती. हे पाहून मला धक्काच बसला आणि मी तिला म्हटलं हे खूप धोकादायक आहे, आत जा. पण ती मला म्हणाली, ‘काही होणार नाही.’ तिला उंचीची भीती वाटत नव्हती, पण तेव्हा तिच्याकडे पाहून मी घाबरले होते”.

दिव्या मोकळं आयुष्य जगायची. जणू काही तिचा आज शेवटचा दिवस अशा पद्धतीने प्रत्येक दिवस ती एन्जॉय करायची. ती फार बिनधास्त राहत असल्याचेही गुड्डीने सागितले. तिने पुढे सांगितलं की, “दिव्या आणि साजिद नाडियाडवाला त्यावेळी सोबत होते. आम्ही ‘शोला और शबनम’ चित्रपटासाठी शुटिंग करत होता”.

मृत्यूच्या आदल्या दिवशी दिव्यासोबत काय घडलं?

या प्रसंगानंतर दिव्याच्या मृत्यूची घटना आठवत गुड्डीने सांगितलं की, “दिव्याचा मृत्यू 5 एप्रिलला झाला आणि त्याच्या एक दिवस आधी म्हणजे 4 एप्रिलला माझा वाढदिवस असतो. म्हणूनच आम्ही सर्वांनी एकत्र पार्टी केली. पार्टीत ती मला थोडी उदास दिसत होती.” गुड्डीने सांगितले की, दिव्याला काही प्रोजेक्टच्या निमित्ताने आऊटडोअर शूटसाठी जायचं होतं, पण तिची जाण्याची इच्छा नव्हती. यानंतर, 5 एप्रिल रोजी सकाळी सर्वांना दिव्याच्या निधनाची बातमी मिळाली. या बातमीने सर्वांनाच धक्का बसला होता. या अपघाताने तिचा पती साजिद नाडियादवाला मोठ्या संकटात सापडला होता. त्याचे संपूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त झाल्यासारखे वाटत होते.” दिव्याचा मृत्यू हा सर्वांना न पचणारा होता हे तिच्या बोलण्यातून लक्षात येतं.

दिव्याच्या मृत्यूनंतर घडलेली आणखी एक भयानक घटना

यासोबतच गुड्डीने दिव्याच्या मृत्यूनंतर घडलेल्या आणखी एका भयानक घटनेबद्दल सांगितले. ती म्हणाली की, “दिव्याच्या मृत्यूनंतर पाहुण्यांनी तिच्या आईला भेटून शोक व्यक्त केला. तेवढ्यात अचानक कुठूनतरी एक मांजर त्यांच्या घरात शिरली आणि तोंडाला रक्त लागलेलं होतं. तिला पाहून तिथे उपस्थित असलेले सर्वजण आश्चर्यचकित झाले. सगळ्यांच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता.” हा प्रसंग सागंत त्या घटनेचा नेमका अर्थ कोणालाच लागला नसल्याचं तिने म्हटलं.

दरम्यान आजही दिव्या भारतीच्या निधनाबद्दल बोललं जातं, त्या रात्री नेमकं असं काय घडलं आणि तिचा मृत्यू कसा झाला याबद्दल अनेक तर्क आणि कहाण्या सांगितल्या जातात. पण तिचं जाण मात्र नक्कीच सर्वांसाठी धक्कादायक आणि फिल्म इंडस्ट्रीसाठी एक मोठं नुकसान होतं. आजही तिची आठवण काढली जाते आणि ती पुढेही सर्वांच्या स्मरणात राहिल यात शंका नाही.