दिव्या दत्ता हे बॉलिवूडसाठी काही नवं नाव नाही. तिने फक्त टीव्ही मालिकांमध्येच नव्हे तर अनेक चित्रपटातही महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. भाग मिल्खा भाग, वीर झारा, पिंजर यांसारख्या चित्रपटांमध्ये तर तिच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं. मात्र अनेक वेळा तिला शूटिंग करताना बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागत असे, त्याचं कारण म्हणजे तिची तब्येत.एकदा एक डेथ सीन करताना दिव्याला प्रचंड त्रास होत होता, तेव्हा बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खान याने तिलची खूप मदत केली होती. दिव्याला डायरेक्टरकडून चांगलाच ओरडा मिळणार होता, पण तेवढ्यात सलमान तिथ आला आणि त्याने तिला वाचवलं. याचा किस्सा खुद्द दिव्या दत्ता यांनीच सांगितला आहे.
क्लॉस्ट्रोफोबिक आहे दिव्या
गेल्या अनेक वर्षांपासून नोरंजन सृष्टीत काम करणाऱ्या दिव्याचं अभिनयाचं नाणं खणखणीत वाजतं. पण ती क्लॉस्ट्रोफोबिक आहे. काही सेकंदानंतर ती श्वास रोखून ठेवू शकत नाही. याचमुळे ती अडचणीत सापजली पण सलमानने पुढाकार घेऊन तिची मदत केली. सिद्धार्थ कनन याला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिव्याने या घटनेचा खुलासा केला आहे. वीरगती चित्रपटाचं शूटिंग करताना हा किस्सा घडल्याचं तिने नमूद केलं. ‘ मी बंद जागेत राहू शकत नाही. किंवा माझा श्वास जास्त काळ रोखून धरू शकत नाही. या चित्रपटाचं शूटिंग करताना मी इतर सीन्स तर सहज पूरण केले. पण मृत्यूचा सीन मी नीट करू शकत नव्हते, कारण तेच.. श्वास रोखून धरायला मला जमतचं नव्हतं. तेव्हा मी अगदी तरूण होते, 18- 19 वर्षांचीच होते. त्यामुळे मी डायरेक्टरलाही खूप घाबरायचे. माझ्या घरी कधीच कोणी माझ्याशी ओरडून बोललं नव्हतं, पण सेटवर डायरेक्टर ओरडले तर मी अगदी सीरियसली घ्यायचे, घाबरून जायचे ‘ असं दिव्या म्हणाली.
अन् सलमान मदतीला धावून आला
सलमानने कशी मदत केली त्याबद्दलही दिव्याने सांगितलं. त्या दिवशी, सलमानचंपॅकअप झालं होतं, तो कारमध्ये बसून निघाला होता. तेवढ्यात काही एडींनी (असिस्टंट डायरेक्टर) त्यांना सांगितले की नवीन मुलीला ( दिव्या) एक सीन करताना खूप त्रास होतो. ते ऐकून सलमान लगेच मदतीसाठी आला. माझ्या त्याच्यावर क्रश होता. त्यामुळे मला त्याच्यासमोर काही चुकीचं करायचं नव्हतं. तो माझ्या समोर बसला, मी जे आता करेन तेच तू कर, असं त्याने मला सांगितलं. तो माझ्या शेजारी जमिनीवर झोपला आणि सीन कसा करावा यासाठी करताना मला मार्गदर्शन करू लागला.
सलमान म्हणाला की, ‘मी आता माझा श्वास रोखून धरला आहे’ आणि तेऐकून मीही माझा श्वास रोखून धरायचे. मी सरळ त्याच्याकडे पहात होते. काही अंक मोजेपर्यंत त्याने श्वास रोखून धरायलं सांगितलं. सलमान मदतीसाठी आल्यावर डायरेक्टरही निश्चिंत झाले. त्यानंतर 10 सेकंदानंतर सलमानने मला डोळे बंद करून श्वास घेण्यास सांगितले.
त्याने त्या दिवशी मला जी मदत केली ते मी कधीच विसरू शकणार नाही. तुमच्या कठीण काळात तुमच्या बाजून कोण उभं राहतं, हे महत्वाचं असतं, ते तुम्ही कधीच विसरू शकणार नाही. मी सलमानकडून खूप काही शिकले, असं सांगत दिव्याने त्याचे कौतुक केले.
सलमानच्या ‘मूडी’ वागण्याबाबतही दिव्या बोलली. माझ्या मनात त्याच्याबद्दल नेहमीच एक सॉफ्ट कॉर्नर असेल. कोणतीही व्यक्ती मूडी असू शकते. आता तो इतका लोकप्रिय झाला आहे की, त्याच्या मूडा नेचरबद्दल स्टोरीज, बातम्या बनणं तर स्वाभाविक आहे ना !